सकाळपासून बेपत्ता असलेले काँग्रेस आमदार प्रताप गौडा पाटील विधानसभेत पोहोचले असून त्यांनी काँग्रेस आमदारांसोबत दुपारचा लंच केला. यावेळी काँग्रेसचे नेते डी.के.सुरेश आणि दिनेश गुंडू राव त्यांच्यासोबत होते. प्रताप पाटील बंगळुरूच्या गोल्डफिंच हॉटेलमध्ये होते. त्यांना पूर्णपणे पोलीस बंदोबस्तात विधानसभेत आणण्यात आले.

प्रताप गौडा पाटील काँग्रेससोबत असून ते आम्हाला दगा देणार नाहीत असा दावा काँग्रेस नेते डी.के.शिवाकुमार यांनी केला. कर्नाटक विधानसभेत आमदारांचा शपथविधी सुरु असताना काँग्रेस आमदार आनंद सिंह आणि प्रताप गौडा पाटील गायब असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीला आता फक्त तासाभराचा अवधी शिल्लक राहिला असून त्याआधी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

कर्नाटकात घोडेबाजार तेजीत
कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी घोडेबाजार तेजीत असून शनिवारी दुपारी काँग्रेसने कथित ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. यात येडियुरप्पांच्या निकटवर्तीयांनी काँग्रेस आमदारांना पैसे व मंत्रीपदाची ऑफर दिल्याचे म्हटले आहे. या दोन्ही सीडींची हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद भाजपाकडे
कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या काँग्रेसला शनिवारी सुप्रीम कोर्टाने दणका दिला. बहुमत चाचणीदरम्यान हंगामी अध्यक्षपदी बोपय्याच असतील असे स्पष्ट करतानाच या बहुमत चाचणीचे वृत्तवाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपण करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी होणार असून या चाचणीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाचे नेते आणि माजी वादग्रस्त सभापती के. जी. बोपय्या यांची नियुक्ती केली.