News Flash

लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर; राज्यांना महत्वाच्या सूचना

करोना प्रतिबंधक लसीकरण शनिवारपासून सुरू होत आहे

संग्रहित

देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण शनिवारपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसंच स्तनपान करणाऱ्या मातांचं लसीकरण करु नये असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने यावेळी लसची अदलाबदल केली जाऊ नये असं स्पष्ट सांगितलं आहे. पहिला डोस ज्या लसीचा देण्यात आला होता त्याच लसीचा डोस दुसऱ्या वेळी दिला जावा असं केंद्राने नमूद केलं आहे. औषध नियामकाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली असून २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागणार आहेत.

ज्यांना करोनाची लागण झाली होती त्यांच्यासाठी प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. करोनाची लक्षणं असणाऱ्यांचं, प्लाझ्मा थेरपी झालेल्यांचं तसंच इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्यांचं लसीकरण चार ते आठ आठवड्यांसाठी स्थगित करावं लागणार आहे.

देशात शनिवारपासून सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला असेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 7:45 am

Web Title: ahead of covid vaccine rollout centre sends rulebook to states sgy 87
Next Stories
1 उद्यापासून लसीकरण
2 तज्ज्ञ समितीतून मान यांची माघार
3 करोना उगमाच्या तपासासाठी ‘डब्ल्यूएचओ’ पथक वुहानमध्ये
Just Now!
X