पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीला वेग आलेला असतानाच आता येथील मुख्य पुजाऱ्याबरोबच १६ सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत. आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य असणारे प्रदीप हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱ्यांपैकी एक आहेत.

नक्की पाहा खास फोटो >> अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. बुधवारी दास यांची मुलाखत घेणाऱ्या काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची या वृत्तानंतर चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे. दास हे ५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. याच प्रार्थनास्थळाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या १६ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

नक्की वाचा >> अयोध्या ते अमेरिका… टाइम्स स्वेअरवरील १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर झळकणार प्रभू रामाची 3D प्रतिमा

उत्तर प्रदेश सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार बुधवारी अयोध्येमध्ये करोनाचे ६६ नवे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत अयोध्येत ६०५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३७५ करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अयोध्या जिल्ह्यात करोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याने अयोध्येमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच अन्य मान्यवरही उपस्थित असणार आहेत. राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठी दोन वॉटफ्रूफ मंडप आणि एक छोट्या आकाराचे स्टेजही उभारलं जाणार आहे.