काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत राहुल गांधीही अमेरिकेला गेले आहेत. हे रुटीन मेडिकल चेक अप आहे अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे या अधिवेशनात सोनिया गांधी उपस्थित राहू शकणार नाहीत. सोनिया गांधी दोन आठवड्यांनी भारतात परततील असंही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितल्याचं एएनआयने म्हटलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी हे एका आठवड्याने भारतात परतणार आहेत. त्यानंतर ते पावसाळी अधिवेशनात सहभागी होतील असंही काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीही या संदर्भात माहिती दिली आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठी सोनिया गांधी अमेरिकेत गेल्या आहेत. करोनामुळे आधीच त्यांना या तपासणीसाठी उशीर झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सोनिया गांधी यांच्यसोबत राहुल गांधीही अमेरिकेत गेले आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारला सध्याच्या आर्थिक मंदीवरुन आणि करोनाला रोखण्यात अपयश आल्याच्या मुद्द्यांवरुन काँग्रेस पावसाळी अधिवेशनात घेरण्याची शक्यता आहे. सोमवारपासून हे अधिवेशन सुरु होतं आहे. मात्र या अधिवेशनाला सोनिया गांधी यांची उपस्थिती नसणार आहे असंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सोनिया गांधी अमेरिकेला जाण्याच्या एक दिवस आधीच पक्षातही काही फेरबदल करण्यात आले आहेत. गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरुन हटवण्यात आलं आहे. आता पावसाळी अधिवेशनात काय होणार ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान राहुल गांधी हे आठवडाभराने भारतात येणार आहेत. त्यानंतर ते पावसाळी अधिवेशनात सहभागी होतील.