राहुल गांधी यांच्या पाटणा दौरापूर्वी एका पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. याआधी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचे प्रभू रामाचा अवतारातील पोस्टर लावले होते.  या पोस्टरमध्ये राहूल गांधींना भगवान शंकराच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. याच पोस्टरमध्ये प्रियंका गांधी यांना दुर्गामातेच्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिषासूराच्या अवतारात दाखवले आहे. दुर्गामातेने महिषासूराचा वध केल्याची प्रतिकृती या पोस्टरमध्ये उभा केली आहे. या पोस्टवर ‘राहुल-प्रियंका का सपना, खुशहाल हो देश अपना.’ असे लिहिण्यात आले आहे. हे पोस्टर काँग्रेसने लावल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पोस्टरमधून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे.

(आणखी वाचा : राहुल गांधींचा राम अवतार पाहिलात का? )

या पोस्टरशी आमचा संबंध नसल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. तर भाजपाने या पोस्टरवर खेद व्यक्त केला आहे. बिहारमधील काँग्रेस प्रदेक्षाध्यक्ष मदन मोहन झा यांनी भाजपाच्या आरोपाचे खंडन केले आहे. ते म्हणाले की, आम्हाला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. बिहारमधील भाजपाचे माजी मंत्री सम्राट चौधरी यांनी  काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. अशा प्रकारचे पोस्टर लावणे खेदजनक आणि दुर्भाग्यापूर्ण असल्याचे ते म्हणाले.

३० वर्षानंतर काँग्रेसने बिहारमध्ये रॅली आयोजित केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. प्रत्येक रस्त्यावर काँग्रेसचे पोस्टर झळकत आहेत. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांना भगवान रामाच्या अवतारात तर मोदी यांना रावणाच्या आवतारात दाखवण्यात आल्याची पोस्टर झळकली होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. अशामध्ये आता पोस्टरवारही सुरू झाले आहे.  पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांना शिवभक्त राहुल गांधी असे संबोधत पोस्टर लावण्यात आले होते. तसेच राहुल गांधी यांनी अनेक मंदिरांचाही दौरा केला होता.