शबरीमाला मंदिरामध्ये १६ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या उत्सवातील दर्शनासाठी १० ते ५० वयोगटातील ५५० महिलांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्रावणकोर देवस्वम समितीने दिलेल्या माहितीनुसार ३.५० लाख भाविकांनी शुक्रवारपर्यंत केरळ पोलीस सुविधा केंद्रात नोंदणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महिलांना शबरीमाला मंदिरात जाण्यापासून रोखू नये असा निकाल दिला. मंदीर महिलांसाठी खुले करण्यात आले. पण यानंतरही मासिक धर्म असलेल्या वयोगटातील काही महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानंतर परंपरावाद्यांकडून प्रचंड विरोध झाला होता. आता १६ नोव्हेंबर रोजी शबरीमाला मंदिराचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले जाणार आहेत. दर्शनासाठी ५५० महिलांनी नोंदणी केली आहे.

शबरीमाला मंदिरामध्ये दर्शनासाठी १० ते ५० वयोगटांच्या महिलांना प्रवेश करण्यास अनुमती नव्हती. मात्र, २८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत बंदी उठवली. महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने प्रार्थना करण्याचा तसेच, कोठेही वावरण्याचा अधिकार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. धार्मिक स्थळावर शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्याय खुला करण्यात आला. यामुळे गर्दीवर पोलिसांना नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. तसेच, आक्रमक होणाऱ्या जमावावरही अंकुश ठेवता येणार आहे.