स्वयंघोषित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्याविरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायालय आज जाहीर करणार आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाकडून राजस्थान , गुजरात आणि हरियाणा या तिनही राज्यांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये आसारामचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथे सुरक्षा वाढवण्यास आणि अतिरिक्त सुरक्षा तैनात ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. बाबा राम रहिमला शिक्षा झाल्यानंतर चंदीगड व पंचकुला भागात त्याच्या समर्थकांनी प्रचंड हिंसाचार केला होता. तसे यावेळी होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, विशेष न्यायालय जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात हा निकाल जाहीर करणार आहे. यानंतर आसारामच्या समर्थकांकडून कायदा व सुव्यवस्थेला असलेली भीती लक्षात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जोधपूरमध्ये १४४ कलम लागू करण्यात आले आहे. येथे चोख सुरक्षा व्यवस्था असून जोधपूरचे रुपांतर छावणीत झाल्याचे चित्र आहे. निकालाच्या दिवसानिमित्त आम्ही सर्व व्यवस्था केली आहे. न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी, आसाराम व सहआरोपी, तसेच अभियोजन व बचाव पक्षांचे वकील हे तुरुंगाच्या आवारातील न्यायालय कक्षात हजर राहतील, असे कारागृह उपमहानिरीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितले.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रकरणांच्या विशेष न्यायालयात या खटल्यातील अंतिम युक्तिवाद ७ एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल २५ एप्रिलला जाहीर करण्यासाठी राखून ठेवला होता.

काय आहे प्रकरण –
मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील असलेल्या आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी १९ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी ती एस.सी.-एस.टी. प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती.