अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने आपला मोर्चा पंजशीरकडे वळवला आहे. आता तालिबान्यांनी या भागात युद्ध सुरू केले आहे. दोन्ही बाजूंकडून पंजशीर ताब्यात त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात आहे. याआधी रविवारी पंजशीर प्रांतातील सर्व जिल्ह्यांचा ताबा तालिबानने घेतल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता पंजशीरमध्ये सुरु असलेल्या गोळीबारात गोळीबारात रेझिस्टन्स फ्रंटचा प्रवक्ता ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रेझिस्टन्स फोर्सशी संबंधित अनेक ट्विटर हँडल्सवर रेझिस्टन्स फ्रंटचे प्रवक्ते फहीम दष्टी यांच्या निधनाची माहितीही देण्यात आली आहे.

तालिबानच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अहमद मसूदचे प्रवक्ते फहीम दष्टी रविवारी पंजशीरमध्ये तालिबानशी लढताना मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. ‘जड अंतःकरणाने आम्ही तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात रेझिस्टन्स फ्रंटचे प्रवक्ते फहीम दष्टी यांच्या मृत्यूची बातमी देत ​​आहोत,’ असे एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र, ट्विटमध्ये यापेक्षा अधिक काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

पंजशीरमध्ये तालिबानच्या वाढत्या संघर्षादरम्यान दष्टी अनेकदा ट्विट करुन माहिती देत असे. तालिबान्यांना या भागातून हाकलून लावल्याची माहितीही त्यांनी रविवारी ट्विट करून दिली होती.

गेल्या महिन्यात, इंडिया टुडेशी बोलताना, फहीम दष्टी म्हणाले होते की, पंजशीरमधील आमचं सैन्य केवळ प्रांतासाठीच नव्हे तर अफगाणिस्तानसाठी तालिबानविरुद्ध लढत आहेत. “आम्ही केवळ एका प्रांतासाठी नाही तर संपूर्ण अफगाणिस्तानसाठी लढत आहोत. आम्हाला अफगाणिस्तान, महिलांच्या, अल्पसंख्यांकांच्या अधिकारांची चिंता आहे. तालिबानला समानता आणि अधिकारांची हमी द्यावी लागेल. आम्ही वेगवेगळ्या देशांशी संपर्कात आहेत,” असे दष्टी म्हणाले.

तालिबान्यांनी रविवारी दावा केला होता की त्यांनी पंजशीर ताब्यात घेतले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, “सर्व जिल्हा मुख्यालये, पोलीस मुख्यालय आणि पंजशीरमधील सर्व कार्यालये जप्त करण्यात आली आहेत. विरोधी फौजांनाही अनेक जीवितहानी झाली आहे. वाहने आणि शस्त्रांचेही नुकसान झाले.”

मात्र, रेझिस्टन्स फ्रंटच्या नेत्याने एका ट्विटमध्ये तालिबानचा दावा फेटाळून लावत, आम्ही रविवारी तालिबानकडून पंजशीरचा पेरियन जिल्हा परत घेतला आणि तालिबानचे मोठे नुकसान केले असे म्हटले आहे.