वर्ष २०१६ मध्ये नोटाबंदी दरम्यान पाच दिवसांत ७५० कोटी रूपयांचे जुने चलन बदलून घेतल्याचा बँकेवर आरोप केल्याप्रकरणी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने (एडीसीबी) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रणदिप सुरजेवाला यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे या बँकेचे संचालक आहेत. नोटाबंदीच्या काळात कोट्यवधी लोकांचे जीवन उद्धवस्त झाले. पण तुम्ही इतक्या मोठ्याप्रमाणात जुन्या नोटा बदलून घेतल्या याचे कौतुक वाटत असल्याचा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता. तर सुरजेवाला यांनीही पत्रकार परिषद घेऊन बँकेवर आरोप केले होते.

या दोन्ही नेत्यांनी बँकेविरोधात खोटे आरोप केल्याचे या बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी १७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

राहुल गांधी यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आरोप करताना २२ जून रोजी एक ट्विट केले होते. अभिनंदन, अमित शाहजी संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक. तुमच्या बँकेने पहिल्या पाच दिवसांत ७५० कोटी रूपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्यामुळे तुम्हाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. लाखो भारतीयांचे आयुष्य नोटाबंदीमुळे उद्धवस्त झाले आहे. तुमच्या या यशाला माझा सलाम, असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले होते.

मुंबई येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नाबार्डने ही माहिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी आणि रणदिप सुरजेवाला यांनी आरोप केले होते. अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेन आपले वकील एस व्ही राजू यांच्या माध्यमातून अर्ज दाखल केला आहे. दोन्ही काँग्रेस नेत्यांनी केलेले वक्तव्य खोटे असून बँकेने इतकी मोठी रक्कम बदलून घेतले नसल्याचे अर्जात स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने नोटाबंदी लागू झाल्यानंतर पाच दिवसांत ७४५ कोटी ६० रूपयांहून जास्त जमा रकमेची चौकशी करावी यासाठी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.