अहमदाबादमधील घोडासर परिसरात २२ वर्षांच्या तरुणीवर चार नराधमांनी धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी रस्त्यावर थांबली असताना कारमधून आलेल्या चौघांनी तिचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार मार्चमध्ये घोडासर परिसरातील झाशीची राणी पुतळा ते नेहरुनगर दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर धावत्या एसयूव्ही कारमध्ये चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणी गाडीची वाट बघत थांबलेली असताना चार जणांनी तिला गाठले. या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चार पैकी दोन जण हिंदू भाषेत बोलत होते. नराधमांनी बलात्काराचे मोबाईलवर चित्रीकरण केले. तसेच माझ्याकडील मोबाईल फोन आणि एक हजार रुपये देखील काढून घेतले. मी या घटनेची वाच्यता केल्यास प्रियकर आणि त्याच्या बहिणीला ठार मारु अशी धमकी मला देण्यात आली होती, असे पीडितेने म्हटले आहे.
काही दिवसांनी नराधमांपैकी वृषभ नावाच्या तरुणाने पीडितेशी संपर्क साधला. त्यांनी माझे अश्लिल फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत माझ्याकडून पैसे उकळले. बुधवारी त्या नराधमांनी पुन्हा एकदा पीडितेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केले. प्रियकराच्या सांगण्यावरुनच हे कृत्य केल्याचे त्या नराधमांनी पीडितेला सांगितले. अखेर पीडितेने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 29, 2018 4:01 pm