गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अहमदाबाद येथील खासगी श्रेय रुग्णालयात घडलेल्या अग्नि तांडवाप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे येथे आयसीयूत उपचार घेत असलेल्या आठ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता.

उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश या न्यायालयीन चौकशीचे नेतृत्व करतील. या शिवाय राज्य शासनाने या प्रकरणी पोलिसांना लवकरात लवकर एफआयआर नोंदवण्याचेही आदेश दिले आहेत.

दरम्यान, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचा अहवाल सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणामध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली व अवघ्या तीन मिनीटांत ती संपूर्ण आयसीयू कक्षात पसरली असल्याचे चौकशीत त्यांना आढळून आले. या शिवाय त्यांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज देखील हस्तगत आहे.

गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले, श्रेय रुग्णालयात ६ ऑगस्ट रोजी घडलेली आगीची घटना मुख्यमंत्र्यांनी अतिशय गंभीरपणे घेतली आहे. मृतांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी चार लाख रुपये तर जखमी झालेल्यांसाठी ५० हजार रुपायांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. याशिवाय त्यांनी एसीएस गृह आणि एसीएस शहर विकासला देखील चौकशीचे आदेश दिले असून तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी दरम्यान दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी एएमसी, एफएसएल, विद्युत निरीक्षक, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तपशील मागवला होता. या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, अहवलाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, वैद्यकीय उपकरणात सर्वप्रथम आग लागली व त्यानंतर ती आयसीयू कक्षात पसरली. अवघ्या तीन मीनिटांत ही आगीची दुर्घटना घडली. आठ रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत गांभीर्याने घेत मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.