अहमदाबाद येथील एका मतीमंद गर्भवतीच्या गर्भपाताची परवानगीची राज्य सरकारची मागणी सत्र न्यायालयाने मान्य केली आहे. ही गर्भवती महिला १४ आठवड्यांची गर्भवती आहे. मानसिकरित्या सशक्त नसल्यामुळे बाळाची काळजी घेणे या महिलेला शक्य होणार नसल्याची राज्य सरकारची बाजू सत्र न्यायालयाने मान्य केली असून तिच्या गर्भपाताला परवानगी देण्यात आल्याचे विशेष सरकारी वकील सुधीर ब्रम्हभट यांनी सांगितले. ही महिला १४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय चाचणीतून समोर आले होते. एखाद्या गर्भवती महिलेच्या गर्भधारणेला २० आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी झाला नसल्यास गर्भपात करता येऊ शकतो, असेही ब्रम्हभट यावेळी म्हणाले. जर या महिलेच्या प्रसुतिचा निर्णय घेतला गेला तर माता आणि बाळाच्या दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होईल त्यामुळे अपवादात्मक प्रकरण म्हणून याकडे पाहण्यात यावे, असे ब्रम्हभट यांनी न्यायालयासमोर सांगितले. सत्र न्यायालयाने सरकारी वकिलांची बाजू योग्य असल्याचे मत नोंदवून या मतीमंद गर्भवती महिलेच्या गर्भपाताला परवानगी दिली. तसेच महिलेच्या कुटुंबियांना शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती ब्रम्हभट यांनी न्यायालयाला दिली आहे.
दरम्यान, अहमदाबादच्या मेघानीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱयांना ही मतीमंद महिला रस्त्यावर पडलेली आढळून आली होती. पोलिसांनी या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर वैद्यकीय चाचणी दरम्यान महिला १४ आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले होते. रुग्णालय प्रशासनाने महिलेची मानसिक स्थिती लक्षात घेऊन तिच्या गर्भपाताच्या परवानगीसाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, महानगर दंडाधिकाऱयांनी गर्भपाताची परवानगी देणे शक्य नसल्याचे सांगत रुग्णालयाची मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर अहमदाबादच्या सत्र न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करण्यात आली होती.