जम्मू काश्मीरमध्ये दररोज सुरु असलेल्या गोळीबार आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तंजीम मेरानी या १४ वर्षीय मुस्लीम मुलीने एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची तिची इच्छा आहे. लाल चौक काश्मीरी फुटीरतावादी आणि आंदोलकांचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणी कायमच पोलीस आणि सैन्य दलांचा खडा पहारा असतो.

तंजीम मेरानी ही अहमदाबादची रहिवाशी असून श्रीनगरच्या लालचौकात आपल्या देशाचा झेंडा फडकवणार असल्याची इच्छा तीने व्यक्त केली असून यासाठी आपल्याला कोणाच्या परवानगीची गरज नाही, असेही तीने म्हटले आहे. तंजीमने गेल्यावर्षी देखील लाल चौकात झेंडा फडकावण्याचा निश्चय केला होता. मात्र, त्यावेळी तिला श्रीनगरच्या विमानतळावरच रोखण्यात आले होते. मात्र, जर यावेळी आपल्याला रोखण्यात आले तर आपण त्याच जागी उपोषणाला बसणार आहोत, असे तीने म्हटले आहे. रक्षा बंधनाच्या मुहुर्तावर याठिकाणी राष्ट्रध्वज फडकवून जवानांना राखी बांधणार असल्याचे तंजीमने म्हटले आहे. यासाठी तंजीमला तीच्या घरच्यांचा पूर्ण पाठींबा आहे.

तंजीमचे वडिल सांगतात, काश्मिरमध्ये जाण्याचा ही योग्य वेळ नाही मात्र, आम्हाला येथे राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी किती काळ वाट पहावी लागणार, असा सवालही त्यांनी केला आहे. यासाठी कोणाला तरी या दिशेने पाऊल टाकावेच लागेल असे सांगतानाच, त्यामुळेच आपल्या मुलीच्या प्रय़त्नांचे त्यांनी समर्थन केले आहे.

तंजीमचे वडिल सांगतात की, हिंदू आणि मुस्लिमांमधील फरकही मला दूर करायचा आहे. रक्षा बंधन हा एक सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत. श्रीनगरमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी तंजीमला काही एनजीओंनी देखील पाठींबा दर्शविला आहे.
श्रीनगरमध्ये आंदोलक पाकिस्तानी आणि आयएसआयएसचा झेंडा फडकावतात यातूनच मला आपला राष्ट्रध्वज येथे फडकवण्याची कल्पना सुचली, असे तंजीमने म्हटले आहे.