अहमदाबादमधील सायबर सेलने बुधवारी एका २५ वर्षीय तरुणाला फसवणूक प्रकरणामध्ये अठक केली आहे. या तरुणाने अनेकांना खोट्या कर्ज योजनेअंतर्गत गंडा घातला आहे. त्याचप्रमाणे फ्री इनर वेअर (अंतर्वस्त्रं) देण्याच्या नावाखाली तो महिलांना अश्लील फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून धकमवायचाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुरज गावळी असं आहे. हा तरुण अहमदाबादमधील चांदखेडा येथील रहीवाशी आहे. अहमदाबाद सायबर क्राइम पोलीस स्थानकामध्ये या मुलाविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. फसवणूक आणि महिलांवर नजर ठेवण्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलाय.

नक्की वाचा >> नवऱ्याने छोट्या साईजचा ब्रा गिफ्ट केल्याने नवरीने लग्नाच्या हॉलमध्येच मागितला घटस्फोट

“आमच्याकडे आलेल्या एका तक्रारदाराने पेटीएमवरुन एक लाख ३५ हजारांचा गंडा घालण्यात आल्याची माहिती दिली. एका अनोळखी व्यक्तीने पाच लाख ८० हजार रुपये कर्ज म्हणून देण्याचं आश्वासन देत हा ऑनलाइन गंडा घातला. या गंडा घालणाऱ्या व्यक्तीने अ‍ॅडव्हान्स इएमआय म्हणून पेटीएमच्या माध्यमातून एक लाख ३५ हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे या व्यक्तीच्या खात्यावर पाठवण्यात आल्यानंतर त्याने फोन बंद करु ठेवला. या व्यक्तीने व्याजाचे पैसेही दिले नाहीत आणि तो एक लाख ३५ हजार घेऊन बेपत्ता झाला,” अशी माहिती अहमदाबाद सायबर सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार हाच तरुण फ्री इनर वेअरच्या नावाखाली महिलांची फसवणूक करायचा. एका इनर वेअर ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी मोफत कपडे देत असल्याने सांगून हा महिलांचे अर्धनग्न फोटो मागवायचा आणि त्यानंतर या फोटोंच्या माध्यमातून त्यांना धमकवायचा. असाच प्रकार त्याने नरोडा येथे एका व्हिडीओ स्टुडीओमध्ये काम करणाऱ्या मुलीसोबत केला. व्हॉट्सअ‍ॅपवरुन या तरुणीला सुरजने आपण इनर वेअर विकणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी असून मोफत कपडे हवे असल्यास पत्ता आणि इतर माहिती पाठवावी असं सांगितलं. त्यानंतर आठवडाभराने याच क्रमांकावरुन सुरजने तरुणीकडे कपड्यांची साईज काय आहे यासंदर्भातील माहितीसाठी फोटो पाठवण्यास सांगितले. या तरुणीने फोटो पाठवल्यानंतर सुरजने तिच्या न्यूड फोटोंची मागणी केली. याला तरुणीने नकार दिला. मात्र त्यानंतर तरुणीला शंका आल्याने तिने पोलिसांकडे तक्रार केली.

नक्की वाचा >> ‘तो’ आहे १७०० कोटींचा मालक मात्र त्याला एक रुपयाही वापरता येत नाही; कारण…

“या तरुणाने एका १८ वर्षीय मुलीवर नजर ठेवली होती. त्याने या मुलीला तू मोफत इनर वेअरसाठी पात्र असल्याचं सांगत तिला एका खोट्या स्कीमबद्दल सांगत तिच्याकडून खासगी माहिती मागवली. त्यानंतर त्याने या तरुणीकडे न्यूड फोटोंची मागणी केली. तरुणीने तातडीने पोलिसांकडे धाव घेत या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापूर्वीही या तरुणाने अशापद्धतीने इतर महिलांना गंडा घातला आहे,” असं पोलीस म्हणाले.

आरोपी सुरजला कलम ४२० फसवणूक, कलम ४०६ विश्वासघात करणे, कलम ३५४ डी नजर ठेवणे आणि कलम ५०० मानहानी करण्याच्या आरोपाखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सुरजने ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असून तो ऑनलाइन ट्रेडिंग करायचा अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.