दिल्लीमध्ये घडलेल्या बुराडी हत्याकांड प्रकरणाप्रमाणेच आणखी एक प्रकरण देशात घडले आहे. गुजरातमधील अहमदाबाद अशाचप्रकारची एक घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिवेदी कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये या कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांची लहान मुलगी अशा तिघांचा समावेश आहे. बुराडी प्रकरणात ज्याप्रमाणे एकाच कुटुंबातील ११ जणांनी अंधश्रद्धेमुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते, त्याचप्रमाणे नरोडा भागात राहणाऱ्या या तिघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत असून त्यानंतरच नेमके प्रकरण समोर येईल.

यामध्ये ४५ वर्षीय कुणाल यांनी घरात फाशी घेतली. त्यांची पत्नी कविता आणि १६ वर्षीय मुलगी श्रीन यांचेही मृतदेह घरात सापडले. या दोघींनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तर कुणाल यांची आई याठिकाणी बेशुद्धावस्थेत सापडली. त्यांनीही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र यातून त्या बचावल्या. मागील २४ तासांपासून त्रिवेदी कुटुंबाचे घर बंद होते. त्यांचे नातेवाईकही त्यांना बराच वेळ फोन करत होते मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नातेवाईक पोलिसांना घेऊन थेट त्रिवेदी यांच्या घरी पोहोचले.

दरवाजा उघडल्यावर कुणाल, कविता आणि श्रीन यांचे मृतदेह पाहून सर्वांना धक्का बसला. पोलिसांनी तपासणी केल्यावर त्यांना एक सुसाईड नोट सापडली. यामध्ये लिहीलेले, ”मम्मी, तु मला कधीच समजू शकली नाहीस. मी अनेकदा काळ्या शक्तीबाबत सांगितले होते मात्र तू कधीच ते मानले नाहीस. तू कायम दारुला कारणीभूत धरलेस” यामध्ये मी कधीही आत्महत्या करु शकत नाही, मात्र काळ्या शक्तीमुळे मी आत्महत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणामागे नेमके काय कारण आहे हे लवकरच समोर येईल.