21 March 2019

News Flash

५ लाखांच्या कर्जाची परतफेड करता न आल्याने दाम्पत्याने रचला चोरीचा बनाव

घरात घुसलेल्या चार चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून घरातून १९ लाख रुपये चोरले, अशी तक्रार अहमदाबाद पोलिसांकडे दाखल झाली होती.

प्रातिनिधीक छायाचित्र

पाच लाख रुपयांचे कर्ज फेडता येणार नसल्याने अहमदाबादमधील एका दाम्पत्याने घरात चोरी झाल्याचा बनाव रचला. निधी शर्मा असे या प्रकरणातील महिलेचे नाव असून घरात घुसलेल्या चार चोरट्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून घरातून १९ लाख रुपये चोरले, असा दावा त्या महिलेने केला होता.

निधी शर्मा या महिलेने ११ एप्रिल रोजी सकाळी अहमदाबाद पोलिसांकडे तक्रार दिली. १० एप्रिलला रात्री घरात चार चोरटे घुसले. चोरट्यांनी माझ्या १३ वर्षांच्या मुलीला बांधून ठेवले आणि तिला मारहाण केली. यानंतर त्यांनी घरातील दागिने व रोख रक्कम असे एकूण १९ लाख रुपयांवर डल्ला मारला आणि घरातून पळ काढला, असे निधी शर्माचे म्हणणे होते. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेले. पण चोरट्यांनी मला धमकी दिल्याने मी त्या वेळी काहीच करु शकले नाही, असे तिने तक्रारीत म्हटले होते.

अहमदाबादमध्ये या प्रकरणाने खळबळ उडाली होती. घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवून चोरी झाल्याने पोलिसांवरील दबाव वाढला होता. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरु केला. मात्र, महिलेच्या जबाबात तफावत होती. तिच्या मुलीला कोणतीही दुखापत नव्हती किंवा शरीरावर खुणा देखील नव्हत्या. महिला देखील जखमी नव्हती, असे पोलिसांच्या लक्षात आले. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. त्यातही काहीच समोर येत नव्हते. शेवटी पोलिसांनी संशयाच्या आधारे निधी शर्माची कसून चौकशी केली आणि तिने बनाव रचल्याची कबुली दिली.

आम्ही एका नातेवाईकाकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते पैसे परत करणे शक्य नव्हते कारण आम्ही ते खर्च करुन टाकले. शेवटी नाईलाज झाला आणि आम्ही हा बनाव रचला असे निधी शर्माने पोलिसांना सांगितले. कर्ज परतफेड करता येणार नाही हे लक्षात येताच निधीचा पती नवनीत बंगळुरुत नोकरीनिमित्त निघून गेला. पत्नी निधी, मुलगी आणि नवनीतची आई हे तिघेही अहमदाबादमध्येच थांबले. यानंतर निधीने घरात चोरी झाल्याचा बनाव रचला, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शर्मा दाम्पत्याविरोधात खोटी तक्रार दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

First Published on April 16, 2018 2:10 pm

Web Title: ahmedabad robbery drama staged to avoid repayment of rs 5 lakh loan