‘राम मंदिर नाही तर मत नाही’ या घोषणेसह पुढील आंदोलन होईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे (एएचपी) प्रमुख प्रवीण तोगडियांनी अयोध्येत दिला आहे. ३२ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि व्हीएचपी एकाच मुद्यावरुन राम मंदिरचे आंदोलन करत होते. संसदेत कायदा बनवून राम मंदिर उभा करावे. पण जेव्हा हेच लोक बहुमताने सत्तेत येतात, तेव्हा राम मंदिराचे दर्शनही घेण्यास येत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला काँग्रेसमुक्त नव्हे तर भाजपाला काँग्रेसयुक्त केल्याची टीकाही केली.

भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, दिल्लीत ५०० कोटींचे कार्यालय भाजपाने उभा केले आहे. पण रामललांना अजून जागा नाही. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवरही आरोप केले. आम्हाला अयोध्येत येण्यापासून रोखले. आमच्या समर्थकांच्या जेवणाचे साहित्य असलेला ट्रक रोखला, असे ‘मुलायम’ यांच्या कार्यकाळातही होत नव्हते, असे ते म्हणाले.

केंद्र सरकार लखनौमध्ये बाबरी मशीद उभारत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचे राम मंदिरचे वचनही ‘जुमला’ सिद्ध झाला आहे. पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, काँग्रेस मुक्त भारत घोषणा देता-देता भाजपालाच त्यांनी काँग्रेस युक्त केले आहे. काँग्रेसचा कचरा, जिथे त्यांना कोणी विचारत नव्हते. त्यांना भाजपात आणून मोठ्या पदांवर बसवण्यात आले आहे. मूळ भाजपा कार्यकर्ते बिचारे राम मंदिरचे स्वप्न पाहत आज रडत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.