देशातील काँग्रेस आणि भाजपेतर पक्षांची शक्ती एकत्रित करून सत्तेची शिडी चढण्यासाठी अण्णाद्रमुक आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आह़े  उभय पक्षांनी येत्या लोकसभा निवडणुकांसाठी तामिळनाडूत युतीची घोषण सोमवारी केली़
या युतीला येत्या निवडणुकांत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास युतीची घोषणा करताना अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी व्यक्त केला़  या वेळी मार्क्‍सवादी पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करातही उपस्थित होत़े  या दोन पक्षांची युती तामिळनाडूत यशस्वी होऊन देशात समर्थ पर्याय देण्यासाठी हातभार लावेल, असे या वेळी करात म्हणाल़े  देशात काँग्रेस आणि भाजपेतर पक्ष मोठय़ा प्रमाणात आहेत़  त्यांची शक्तीही मोठी आहे आणि त्यांनाही लोकांचा मोठा पाठिंबा आहे आणि त्याचे प्रतिबिंब येत्या निवडणुकांमध्ये उमटेलच, असेही करात म्हणाल़े
त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, या प्रश्नाला मात्र जयललिता आणि करात या दोघांनीही बगल दिली़  आताच या गोष्टीची चर्चा करणे निर्थक आह़े  निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतरच याबाबत प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितल़े
रविवारी अण्णाद्रमुकने भारतीय कम्युनिस्ट पक्षाशीही युतीची घोषणा केली होती़  २०११च्या विधानसभा निवडणुकांपासूनच तामिळनाडूमधील डावे पक्ष अण्णाद्रमुकसोबत आहेत़  जयललिता यांनी डाव्या पक्षांच्या दोन उमेदवारांना राज्यसभेवर जाण्यासाठी पाठिंबा दिल्याने ही युती अधिक बळकट झाली होती़
भाजपनेही तामिळनाडूमध्ये एमडीएमकेशी हातमिळवणी केलीच आहे आणि पीएमके व अभिनेता-राजकारणी विजयकांत यांच्या डीएमडीकेशी सूत जमविण्याचेही भाजपचे प्रयत्न सुरू आहेत़  डीएमकेने श्रीलंकेतील तामिळ प्रश्नावर काँग्रेसची साथ सोडली आहे आणि तेही डीएमडीकेशी हातमिळवणीच्या प्रयत्नात आहेत़  मात्र डीएमडीकेने अद्याप युतीची कोणतीही घोषणा केलेली नाही़  काँग्रेसनेही राज्यात अद्याप कोणाशीही युतीची घोषणा केलेली नाही़