बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि ‘अण्णाद्रमुक’मधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांना शुक्रवारी पॅरोल मंजूर झाला. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची भेट घेता यावी यासाठी शशिकला यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.

सुप्रीम कोर्टाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना चार वर्षांचा तुरुंगवास सुनावला असून सध्या त्या बंगळुरुमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. शशिकला यांच्यावतीने ‘इमर्जन्सी पॅरोल’साठी अर्ज करण्यात आला होता. शशिकला यांचे पती नटराजन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांचे नुकतेच यकृत प्रत्यारोपण करण्यात आले आहे. पती आजारी असल्याने पॅरोल मंजूर करावा, असा अर्ज शशिकला यांनी कर्नाटकच्या कारागृह विभागाकडे दिला होता. ३ ऑक्टोबररोजी कागदपत्र अपुरी असल्याने कारागृह विभागाने शशिकला यांचा अर्ज फेटाळला होता. गुरुवारी शशिकला यांच्यावतीने पुन्हा अर्ज करण्यात आला. अर्जासोबत शशिकला यांच्या पतीच्या आजारपणाविषयीची कागदपत्रेही जोडण्यात आली होती.

शुक्रवारी कारागृह विभागाने शशिकला यांचा अर्ज मंजूर केला. शशिकला यांना पॅरोल मंजूर होताच शशिकला यांचे समर्थक बंगळुरुमधील तुरुंगाबाहेर जमले. दिनकरन हे देखील तुरुंगाच्या परिसरात पोहोचले आहेत. दुपारपर्यंत शशिकला तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शशिकला आणि दिनकरन यांची काही दिवसांपूर्वीच अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घेतला होता. पलानीस्वामी यांच्या निर्णयानंतर दिनकरन समर्थक १८ आमदारांनी पलानीस्वामींविरोधात बंड केले. शेवटी पलानीस्वामी यांनी या आमदारांना अपात्र ठरवले होते. सध्या हे प्रकरण हायकोर्टात असून या पार्श्वभूमीवर शशिकला यांना पॅरोल मंजूर झाला आहे.