बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची शनिवारी येथील कारागृहातून जामिनावर मुक्तता करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर केला. मात्र सुटकेसाठी लागणारी औपचारिकता पूर्ण करावयाची असल्याने त्यांची शनिवारी कारागृहातून सुटका करण्यात आली.
विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉन मायकेल डीकुन्हा यांनी जयललिता यांच्या सुटकेचे आदेश जारी केल्यानंतर त्या कारागृहातून बाहेर आल्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार यांनी जयललिता यांचे कारागृहाबाहेर स्वागत केले. नंतर त्या विशेष विमानाने चेन्नईला रवाना झाल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत सादर करण्यात आल्यानंतर जयललिता यांच्याकडून दोन कोटी रुपयांचा जातमुचलका आणि हमी घेण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. जयललिता यांच्या सहकारी शशिकला आणि त्यांचे नातेवाईक सुधाकरन आणि इलावरासी यांनीही याच अटींची पूर्तता केली आणि त्यानंतर त्यांचीही कारागृहातून सुटका करण्यात आली.
जामीन मंजूर झाल्याचे वृत्त कळताच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी कोणतीही उत्सुकता दर्शविली नाही, तर त्यांनी केवळ स्मितहास्य केले, असे कर्नाटकचे तुरुंग महानिरीक्षक जयसिंह यांनी सांगितले. जयललिता यांनी आपला आनंद शशिकला आणि इलावरासी यांच्याकडे व्यक्त केला. मात्र त्यांनी लाडू वाटल्याचे वृत्त निराधार असल्याचे जयसिंह म्हणाले
अन् जयललितांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटले..
बंगळुरू : जामीन मंजूर झाल्याचे वृत्त कळताच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी कोणतीही उत्सुकता दर्शविली नाही, तर त्यांनी केवळ स्मितहास्य केले, असे कर्नाटकचे तुरुंग महानिरीक्षक एम. जयसिंह यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुटकेच्या आदेशाची प्रत घेऊन आपण जयललिता यांच्याकडे गेलो तेव्हा त्या शांत होत्यो, असे जयसिंह म्हणाले.जयललिता यांनी आपला आनंद शशिकला आणि इलावरासी यांच्याकडे व्यक्त केला.