एका व्यक्तीच्या पोटात २० सेंटीमीटरचा चाकू आणि तोही लिव्हरच्या जवळ. ऐकूण चक्कर येईल, पण ही बातमी खरी आहे आणि भारतातीलच आहे. एका २८ वर्षांच्या व्यक्तीच्या पोटात हा चाकू होता. दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करून हा चाकू बाहेर काढला आहे. या व्यक्तीला १२ जुलै रोजी सफदरजंग रुग्णालयातून एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

हरयाणातील असलेल्या या २८ वर्षीय व्यक्तीवर १९ जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एम्सच्या गॅस्ट्रोएन्टोरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. दास म्हणाले की, “शस्त्रक्रिया करण्यात आलेली व्यक्ती आधी अमली पदार्थांचं सेवन करायचा. ड्रग्ज न मिळाल्यानं त्यानं दीड महिन्यापूर्वी फोल्ड होणारा चाकू गिळला होता.” असं दास यांनी सांगितलं.

चाकू गिळल्यानंतरही ही व्यक्ती इतर माणसांप्रमाणे जगत होता. त्याच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. मात्र, एका महिन्यानंतर त्याला पोटात त्रास सुरू झाला. कुटुंबीय या व्यक्तीला डॉक्टरकडे घेऊन गेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी जे सांगितलं, ते ऐकून सगळ्यानाच धक्का बसला. या व्यक्तीच्या पोटात चाकू असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं. डॉ. दास यांनी शस्त्रक्रियेविषयी बोलताना सांगितलं की, “एक्स-रे रिपोर्टमध्ये चाकू एकदम लिव्हरच्या जवळ असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे शस्त्रक्रिया करणं खुप आव्हानात्मक होतं. आम्हाला शस्त्रक्रिया करुन चाकू बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास लागले,” असं दास म्हणाले.

“एक छोटी चूक सुद्धा धोकादायक ठरली असती. त्यामुळे संपूर्ण शस्त्रक्रियेचं आधीच नियोजन केलं होतं. सर्वात आधी एका रेडिओलॉजिस्टनं व्यक्तीच्या छातीत व लिव्हर जवळ जमलेली घाण साफ केली. संसर्ग वाढू नये म्हणून हे करण्यात आलं होतं. त्यानंतर व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञाकडे पाठवण्यात आलं. जेणेकरून या शस्त्रक्रियेसाठी तो मानसिकरीत्या तयार व्हावा,” असं दास म्हणाले. “१९ जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्या व्यक्तीला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आलं. त्याचबरोबर शस्त्रक्रियेवेळी एक स्वतंत्र अन्न नलिका तयार करण्यात आली आहे. त्या नलिकेद्वारेच त्याला अन्न दिलं जात आहे,” असं माहिती डॉ. दास यांनी दिली.