देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सर्वाच्या नजरा कोविड-१९ आजाराला प्रतिबंध करणारी लस कधी तयार होते याकडे लागल्या आहेत. दरम्यान, भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार होत असल्याचे जाहीर केले होते. या लसीची मानवी चाचणीही आता सुरु झाली आहे.

पटनाच्या ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये या लसीची मानवी चाचणी १० जुलैपासून सुरु झाली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक या फार्मा कंपनीने इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) सोबत पार्टनरशीपमध्ये या लसीवर काम सुरु केले आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे वेगळ्या केलेल्या सार्स-कोव्ह-2 (COVID-19) विषाणूंच्या स्ट्रेन्समधून ही लस तयार करण्यात येत आहे.

पटना एम्सने या लसीच्या चाचणीसाठी रुग्णालयाच्या परवानगीने १० स्वयंसेवकांवर याची चाचणी सुरु केली आहे. ऑल इंडिया रेडिओच्या हवाल्याने टाइम्स नाउने याबाबत वृत्त दिले आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे.

लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. कोवॅक्सिनच्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी पटना एम्स हे एक ठिकाण आहे. पटना एम्सचे अधीक्षक डॉ. सी एम सिंह यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, या लसीची चाचणी केवळ २२ ते ५० वयोगटातील सुदृध लोकांवरच केली जाणार आहे.

दरम्यान, टाइम्सनाउ डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत भारत बायोटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. कृष्णा इला म्हणाले, “आम्हाला विश्वास आहे की, ही लस SARS-CoV-2 virus या विषाणूवर काम करेल. भारत बायोटेक सुरुवातीला या लसीच्या २०० मिलियन व्हायोल्स बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हैदराबादमधील जिनोम व्हॅली येथे ही लस तयार करण्यात आली आहे. प्राण्यांवर संशोधनासाठी ही जागा अत्यंत प्रभावी असल्याचे सांगण्यात येते.