“मी देवाला पाहिलेलं नाही मात्र, मोदीजी देवाच्या रुपात तुम्हाला पाहिलं आहे.” असं एका आजारी महिलेनं म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. जेनेरिक औषधे दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ही भावनिक घटना घडली. यावेळी अर्धांगवायू झालेल्या या महिलेनं म्हटलं, जेनेरिक औषधांमुळे माझ्या प्रकृतीत सुधारणा होत असून खर्चही कमी झाला आहे.

अर्धांगवायू झालेल्या दीपा शाह आपला अनुभव सांगताना म्हणाल्या, “२०११ मध्ये मला आर्धांगवायूचा झटका आला. मी त्यावेळी बोलू शकत नव्हते. माझ्यावर जे उपचार होत होते ते खूपच महागडे होते. त्यामुळे घर चालवणं अवघड बनलं होतं. त्यानंतर मी जेनेरिक औषधं घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे पैशांची बचत झाली. सुरुवातीला ५ हजारांची औषध घ्यावी लागत होती, आता ती १५०० रुपयांत मिळतात. उरलेल्या पैशांत घरखर्च भागवते. मी कधीही देव पाहिलेला नाही, मात्र देवाच्या रुपात मोदींना पाहिलं आहे.” या विधानानंतर दीपा रडायला लागल्या. यावेळी तिचं रडणं पाहून पंतप्रधान मोदी देखील भावूक झाले.

यानंतर दीपा यांच्याशी संवाद साधताना मोदी म्हणाले, “तुम्ही आजाराला हरवलं आहे. तुमचा आत्मविश्वासच मोठा देव आहे. तोच तुमचा देव आहे. त्याच्यामुळेच तुम्ही संकटातून बाहेर येऊ शकला. दरम्यान, मोदींनी जेनेरिक औषधांचे कौतुकही केले. या औषधांमुळे दीपा ठीक झाल्या आहेत यावरुन आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध औषधांच्या तुलनेत ही औषध कमी परिणामकारक नाहीत. हाच याचा पुरावा आहे,” असे मोदी यावेळी म्हणाले.