येत्या काही काळात भारत कार्बन पदचिन्हांचे (कार्बन फूट प्रिंट) प्रमाण ३० ते ३५ टक्के कमी करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करील, अशा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले, की या दशकात नैसर्गिक वायूचा वापर चार पटींनी वाढवला जाणार असून तेलशुद्धीकरण क्षमता येत्या पाच वर्षांत दुप्पट करण्यात येईल.

पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभप्रसंगी  ते दूरसंवादाच्या माध्यमातून बोलत होते.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे, की ‘आज देश कार्बन पदचिन्हे ३० ते ३५ टक्के कमी करण्याच्या दिशेने जात आहे. मी जगाला जेव्हा हे सांगतो तेव्हा त्यांना आश्चर्याचा  धक्का बसतो. पण आम्ही ते करू  शकतो. नैसर्गिक वायूचा वापर वाढवून व तेलशुद्धीकरण प्रक्रिया क्षमता वाढवून हे  शक्य आहे. ठरावीक मुदतीच्या आधीच भारत अक्षय ऊर्जा निर्मिती प्रक्रिया पूर्ण करील. आज सौर ऊर्जेचा दर युनिटला २ रुपयांपेक्षा कमी आहे, जो आधी युनिटला १२ ते १३ रुपये होता. सौरऊर्जा हा देशाचा अग्रक्रम आहे. आम्ही १७५ गिगॅवॉट ऊर्जा सौरमाध्यमातून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते २०२२ च्या आधीच पूर्ण केले जाईल. अक्षय ऊर्जेचे ४५० गिगॅवॉटचे उद्दिष्ट २०३० पर्यंत किंवा त्याआधीच आम्ही पूर्ण करू.’

कोटय़वधींची गुंतवणूक आणि विद्यार्थ्यांना संधी

त्यांनी सांगितले की, ‘या दशकात तेल व वायू क्षेत्रात कोटय़वधींची गुंतवणूक होईल. त्यातून पदवीधर विद्यार्थ्यांना संशोधन, उत्पादन व  इतर क्षेत्रात संधी मिळतील. ऊर्जेशी संबंधित नवोद्योग सुरू केले जात आहेत. तुमच्याकडे संकल्पना असेल तर निधी दिला जाईल, नवोद्योगांसाठी अधिशयन काळात दिल्या जाणाऱ्या निधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता.’

जे लोक जबाबादारीने काही उद्देश ठेवून काम करतात ते आयुष्यात यशस्वी होतात, जे लोक ओझ्याखाली जगतात ते यशस्वी होत नाहीत. २१ व्या शतकातील युवकांनी कोरी पाटी घेऊन जगापुढे जावे. आपण काहीच बदलू शकत नाही, ही भावना मनातून काढून टाका. स्वच्छ भारत कार्यक्रमात आम्ही चांगले उदाहरण पुढे ठेवले आहे. आज कोटय़वधी लोकांच्या लहानशा प्रयत्नांना यश आले आहे.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान