करोनाकाळ आव्हानात्मक : आर्थिक मदत सुरूच ठेवण्याची अर्थमंत्र्यांची ग्वाही

पी वैद्यनाथन अय्यर, एक्स्प्रेस वृत्तसेवा

नवी दिल्ली : आता अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू झाल्याने करोना संकटकाळात विविध घटकांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.

उत्पादन क्षेत्रात वृद्धीची चिन्हे असून ग्रामीण अर्थव्यवस्थेतही धुगधुगी निर्माण झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ऑगस्टमधील जीएसटी संकलन  समाधानकारक आहे, ई-वे बिल आकारणीत ऑगस्टमध्ये वाढ झाली असून पोलाद निर्यातीतही  वृद्धी होत आहे, असे सीतारामन यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ला शनिवारी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘टाळेबंदीच्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने कमी झाली नाहीत, तर त्यांचे स्वरूप बदलले..आणि अर्थमंत्रालय आता या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देत मार्ग काढत आहे.’’

करोना साथीमुळे गावाला गेलेले वस्त्रनिर्मितीसारख्या उद्योगातील परप्रांतीय कामगार पुन्हा कामावर येत आहेत. काही क्षेत्रांतील निर्यातही हळूहळू वेग घेत आहे. उदा. पोलादाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. सध्याच्या देशांतर्गत मागणीपेक्षा परदेशातून मागणी वाढली असल्याचेही सीतारामन यांनी नमूद केले.

सीतारामन यांनी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेने वेग घेतला असून तीत जोमदार वाढ झाल्याचे सांगितले.

‘‘केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे, तर अकृषक क्षेत्रांतील अर्थव्यवहारातही मोठी वाढ झाल्याचे सीतारामन म्हणाल्या.

मोठय़ा क्षेत्रांतील उत्पादन घसरणीमुळे अर्थव्यस्थेचे झालेले नुकसान गेल्या तीन महिन्यांत भरून निघाल्याचे  आकडेवारीवरून स्पष्ट होते. जीएसटीच्या महसुलात वाढ झाली आहे. यंदाचे जीएसटी संकलन गेल्यावर्षीच्या ऑगस्टमधील ८८ टक्के संकलनाच्या तुलनेत समाधानकारक आहे. ई वे बिल आकारणी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ९७.२ टक्के होती. त्या तुलनेत यंदाही वाढ झाली आहे. आयएचएस मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जुलैमध्ये ४६ होता. तो ऑगस्टमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर- ५२ वर पोहोचला.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि आत्मनिर्भर भारत योजनेवरील खर्च जीडीपीच्या १.२ टक्के राहिला आहे. परंतु निती आयोग आणि पंतप्रधानांच्या अर्थ सल्लागार परिषदेने जून-जुलैमध्ये पंतप्रधानांसमोर केलेल्या सादरीकरणात हा खर्च जीडीपीच्या ४.५ टक्क्य़ांपर्यंत वाढवण्याची सूचना केली होती.

या संदर्भात सरकारमधील एका विभागात असंतोष निर्माण झाल्याचे निदर्शनास आणले असताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, ‘‘मला तसे वाटत नाही. पंरतु मी आर्थिक योजना सुरू ठेवण्याबाबत सकारात्मक आहे.’’

खात्रीशीर लसीअभावी करोना विषाणूची जागतिक साथ संपण्याची लक्षणे दिसत नसल्याची हतबलता व्यक्त करत, सध्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या स्वरूपाच्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची कबुलीही   सीतारामन यांनी दिली.

अर्थमंत्र्यांचा आशावाद

’पोलाद निर्यातीत वृद्धी

’ग्रामीण अर्थव्यवस्थेला धुगधुगी

’ऑगस्टमधील जीएसटी संकलन समाधानकारक

’ई-वे बिल आकारणीत ऑगस्टमध्ये वाढ

’उत्पादन क्षेत्रात वृद्धीचे संकेत

दिलासादायक चित्र

सहा महिन्यांपासून अधिक काळ असलेली करोना विषाणूची महासाथ, कडक टाळेबंदीमुळे एप्रिल ते जून या कालावधीत सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी)- २३.९ टक्क्य़ांनी झालेला संकोच या पाश्र्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र दाखवले आहे.  करोना संकटात अर्थचक्राची गती मंदावली असली तरी लाभार्थीच्या खात्यांवर थेट पैसे जमा करण्याच्या योजनांमध्ये कोणतीही बाधा आलेली नाही. त्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले.