X
X

‘वंदे मातरम्’ सक्तीतून भाजपला देशात हिंदुत्ववाद पसरवायचाय: ओवैसी

READ IN APP

'वंदे मातरम्'ची सक्ती घटनाबाह्य

‘वंदे मातरम्’च्या सक्तीवरून ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वंदे मातरम् गायलाच हवं अशी सक्ती करून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारला देशात हिंदुत्ववाद पसरवायचा आहे आणि देशातून धर्मनिरपेक्षता नष्ट करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करणं असंवैधानिक असल्याचंही ते म्हणाले.

वंदे मातरम् बंधनकारक करणं चुकीचं असून असंवैधानिक आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहेच, पण ते गाण्याची सक्ती करणं गैर आहे, असं ओवैसी म्हणाले. राष्ट्रीय गीत सर्वांनीच गायलं पाहिजे, अशी सक्ती करून देशात हिंदुत्ववादाचा प्रसार केला जात आहे; तसंच धर्मनिरपेक्षता हद्दपार करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केल्याचं वृत्त ‘एएनआय’नं दिलं आहे. अशा प्रकारची सक्ती करून भाजपला देशात एकतर हिंदुत्वाचा प्रसार करायचा आहे. तसंच ‘घटनात्मक राष्ट्रवादा’चा प्रसार करायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही मुस्लिम अल्लाला मानतो, पण म्हणून आमचं देशावर प्रेम नाही असा त्याचा अर्थ होत नाही. देशासाठी मुस्लिमांनी अनेक त्याग केले आहेत. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. तसंच देशासाठी आमची त्याग करण्याची तयारीही आहे. घटनेनं आम्हाला धर्मिक स्वातंत्र्य दिलं आहे. मग आम्ही हिंदुत्वाचा प्रसार का करायचा, असा सवालही त्यांनी केला.

‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा सरकारकडून दिला जातो. पण हे सरकारचं नाटक आहे. केवळ हिंदुत्वाचा प्रसार करणं हाच या भाजप सरकारचा अजेंडा आहे, असा घणाघातही त्यांनी केला. यावेळी ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही तोफ डागली. धर्मनिरपेक्षता देशासाठी आदर्श आहे. पण संघाची हिंदुत्ववादी विचारधारा देशाला अशक्त करत आहे, अशा शब्दांत त्यांनी संघावर हल्ला चढवला.

24
X