18 February 2019

News Flash

‘दहशतवाद्यांशी लढताना ५ मुस्लीम जवान शहीद, देशभक्तीवर शंका घेणारे कुठं आहेत’

भाजपा-पीडीपीवाले दोघे एकत्रित बसून मलई खात आहेत.

'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी

एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू-काश्मीरमधील सुंजवान लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि सत्ताधारी पीडीपी-भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणी काहीच बोलताना दिसत नाही. मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

ओवेसी यांचा प्रमुख रोख हा हिंदुत्ववादी संघटनांकडे होते. तसेच भाजपाच्या काही वाचाळ नेत्यांनी मुसलमानांनी पाकिस्तानात जाऊन राहावे असा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार ओवेसी यांनी घेतला. ते म्हणाले, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणीच काही बोलताना दिसत नाहीये. मुसलमानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांनी आणि आजही पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घ्यायला हवा.. आम्ही तर देशासाठी जीव देत आहोत.

जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी सरकारवरही त्यांनी यावेळी हल्ला केला. भाजपा-पीडीपीवाले दोघे एकत्रित बसून मलई खात आहेत. कधीपर्यंत नाटकं करीत राहतील हे लोक. हे यांचे अपयश आहे. याची जबाबदारी कोणाची असेल, याचा विचार करायला हवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, जम्मू- काश्मीर येथील श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांचा ३१ तासांच्या चकमकीनंतर खात्मा करण्यात यश आले. यातील एका दहशतवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलांच्या हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.

श्रीनगरमधील सीआरपीएफच्या तळावर सोमवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेचारच्या सुमारास दहशतवाद्यांनी तळात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहारेकऱ्याला बॅकपॅक आणि शस्त्रे बाळगणाऱ्या दोन संशयित व्यक्ती दिसल्यानंतर त्याने दोघांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

First Published on February 13, 2018 3:00 pm

Web Title: aimim mp asaduddin owaisi react on jammu kashmir terror attack slams on bjp pdp