हैदराबादमधील महानगरपालिकेची निवडणूक असली तरी ती निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. हैदराबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस. दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. निकालांनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली तर भाजपनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, निकालानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

“आम्ही ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पेरेशनच्या निवडणुकांमध्ये ४४ जागांवर विजय मिळवला आहे. मी सर्व नगरसेवकांशी चर्चा केली असून त्यांना काम सुरू करण्यासही सांगितलं आहे,” असं ओवेसी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष टीआरएसवरही भाष्य केलं. “टीआरएसला निकांलांची समीक्षा करण्याची गरज आहे. तेलंगणमधील टीआरएस ही एक चांगला दर्जा असलेला राजकीय पक्ष आहे. ते तेलंगणमधील क्षेत्रीय भावनांचं प्रतिनिधीत्व करतात. के.चंद्रशेखर राव नक्कीच या पक्षाच्या कामगिरीची समीक्षा करतील असा विश्वास आहे,” असं ओवेसी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. आम्ही भाजपशी लोकशाही पद्धतीनं लढू. तेलंगणमधील नागरिक भाजपाला त्यांच्या विचारधारेचा विस्तार करण्यापासून रोखतील असा विश्वास असल्याचंही ओवेसी यांनी नमूद केलं.

भाजपने ४६ जागा पटकावून या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएस या प्रादेशिक पक्षाला भाजपने आपला पर्याय निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. हा भाजपचा ‘सॅफ्रॉन स्ट्राइक’ असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे.

या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याचे टीआरएसने मान्य केले आहे, मात्र पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव म्हणाले की, निकालामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही. टीआरएसला सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी टीआरएसला ९९ जागा

या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएसने चार वर्षांपूर्वी १५० पैकी ९९ जागा पटकावून बाजी मारली होती. या निवडणुकीत ७४.६७ मतदारांपैकी केवळ ३४.५० लाख मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता, मतदानाची टक्केवारी ४६.५५ टक्के इतकी होती.