सध्या देशात ऑटो रिक्षापेक्षा हवाई प्रवास सवस्त झाला आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रति किलोमीटरचा विचार केल्यास ऑटो रिक्षापेक्षा हवाई तिकिट स्वस्त पडते असे केंद्रीय हवाई उड्डायाण राज्यमंत्री जयंत सिन्हा सोमवारी म्हणाले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर एअरपोर्टवर नव्या टर्मिनल बिल्डींगच्या उदघाटनच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सध्या ऑटोरिक्षा पेक्षा हवाई प्रवास स्वस्त झाला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे ? जेव्हा दोन जण रिक्षाने प्रवास करतात तेव्हा दहा रुपये भाडे आकारले जाते. याचा अर्थ प्रति किलोमीटरसाठी पाच रुपये आकारले जातात. पण तेच हवाई प्रवासात प्रति किलोमीटरसाठी चार रुपये मोजावे लागतात. आपल्या या विधानावर स्पष्टीकरण देताना जयंत सिन्हा म्हणाले कि, छोटया पल्ल्याच्या प्रवासासाठी हवाईमार्गाचा अवलंब करा असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. तुम्ही वाहतुकीच्या अन्य पर्यायांशी हवाई प्रवासाची तुलना केल्यास हवाई प्रवास आता अवाक्यात आला आहे असे मला म्हणायचे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हवाई क्षेत्राची मोठी प्रगती झाली आहे. २०१८ मध्ये हवाई प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे असे जयंत सिन्हा म्हणाले. २०१३ पर्यंत देशातील सहा कोटी लोक विमानाने प्रवास करायचे. आता हाच आकडा १२ कोटी झाला आहे असे सिन्हा म्हणाले. आधी ७५ विमानतळ होते आता १०० विमानतळ देशात कार्यरत आहेत असे सिन्हा यांनी सांगितले.