लष्करप्रमुख बीपिन रावत यांच्या पाठोपाठ इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. इंडियन एअर फोर्स नेहमीच अलर्ट असते. “भारत-पाक सीमेवर पाकिस्तानची कुठलीही आगळीक रोखण्यासाठी एअर फोर्स नेहमीच सर्तक असते” असे धनोआ यांनी मंगळवारी सांगितले. “सीमेवर शत्रूच्या हालचाली सुरु असल्या किंवा नसल्या तरी एअर फोर्स नेहमीच अलर्ट असते” असे धनोआ म्हणाले.

“पाकिस्तानने भारताबरोबर युद्ध केले तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल” असा इशारा लष्कर प्रमुख बीपिन रावत यांनी आधीच दिला आहे. बी.एस.धनोआ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संरक्षण साहित्याच्या स्वदेशीकरणासंबंधीच्या पुस्तकाचे प्रकाशन केले.

“जुनी युद्ध उपकरणे बदलण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित होण्याची वाट पाहू शकत नाही. त्याचवेळी प्रत्येक उपकरण परदेशातून आयात करणेही योग्य नाही. आता स्वेदशात विकसित झालेली शस्त्रास्त्रे जुन्या शस्त्रांची जागा घेत आहेत” असे धनोआ म्हणाले. इंडियन एअर फोर्स पूर्णपणे सक्षम आणि तांत्रिक दृष्टया प्रगत आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

बालाकोटच्या वेळीच भारतीय सैन्य होतं तयार
बालकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय लष्कर पाकिस्तानात घुसून युद्ध लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज होते. पाकिस्तानने आक्रमकता दाखवल्यास ठोस प्रत्युत्तर देण्यास आपले सैन्यदल पूर्णपणे तयार असल्याचे लष्कर प्रमुख बीपिन रावत यांनी सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाला कळवले होते. वरिष्ठ लष्करी सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. शत्रू प्रदेशात घुसून पाकिस्तानला धडा शिकवण्याची भारतीय लष्कराने तयारी ठेवली होती.