जयपूर : भारतीय हवाई दलाचे मिग-२७ लढाऊ विमान जोधपूरमधील बनाड भागातील एका शेतात कोसळले. यात प्राणहानी झाली नाही, वैमानिकाने सुरक्षितपणे सुटका करून घेतली. एक आसनी विमानाची ही नेहमीची फेरी होती. वैमानिकास भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे.

जोधपूर येथून निघालेले विमान मंगळवारी नेहमीच्या उड्डाणास गेले असताना हा अपघात झाला. यात अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रशियन बनावटीच्या मिग २७ विमानांचे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. जोधपूर पूर्वचे पोलिस उपायुक्त अमनदीप सिंग कपूर यांनी सांगितले, की दांग्यावास पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला असून त्यात प्राणहानी झाली नाही.

दोन लढाऊ मिग २७ विमानांपैकी एकाने अचानक दिशा बदलली आणि नंतर देवलिया खेडय़ाजवळ ते कोसळले. वैमानिक यातून बाहेर पडताना दिसला व तो पॅराशूटच्या मदतीने शेतात पडला. जास्त लोकसंख्येच्या भागात विमान पडू नये यासाठी ते लोकवस्ती कमी असलेल्या भागातील एका शेताकडे वळवण्यात आले. भारतीय हवाई  दलाचे तपास पथक तेथे पोहोचले आहे.