भरधाव वेगातील गाडीने चिरडल्यामुळे कोलकात्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला. अभिमन्यू गौड (२१) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संचलनाचा सराव करीत असतानाच ही घटना घडली.
अभिमन्यू गौड हे हवाई दलाच्या एका संचलन पथकाचे प्रशिक्षक होते. हे संचलन पथक येत्या २६ जानेवारीला कोलकात्यात होणाऱ्या संचलनात सहभागी होणार होते. त्याचा सराव कोलकात्यातील लाल रस्त्यावर सुरू असताना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या ऑडी गाडीने त्यांना उडविले. विशेष म्हणजे संचलनाच्या सरावासाठी पोलिसांनी या संपूर्ण परिसरात बॅरीकेड उभ्या केल्या होत्या. त्या भेदून वेगाने ही गाडी संचलन सुरू असलेल्या मार्गात घुसली. या गाडीखाली अभिमन्यू गौड चिरडले गेले. त्यांना तातडीने कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
संबंधित ऑडी गाडीचा चालक अपघातानंतर तेथून पसार झाला. या प्रकरणी कोलकाता पोलीस अधिक तपास करीत आहेत. अभिमन्यू गौड हे मूळचे सूरतमधील असून ते पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूरमध्ये नियुक्तीला होते.