नोकरी देतो… लग्न करतो…अशी आमिषे दाखवत एका खासगी कंपनीतील बड्या अधिकाऱयाने हवाईसुंदरीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दिल्लीतील वसंतकुंज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. २६ वर्षांची ही हवाई सुंदरी मुळची मुंबईची आहे. 
तिने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका गुंतवणूक बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अजून संबंधिताला अटक झालेली नाही. संबंधित हवाईसुंदरी दुबईला एमिरेट्समध्ये काम करत होती. मुंबईमध्ये एका कार्यक्रमात तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर तुला नोकरी मिळवून देतो, तुझ्याशी लग्न करेन, अशी आश्वासने देत संबंधिताने त्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले. जूनमध्ये हे दोघेही सुटीसाठी दिल्लीमध्ये आले होते. वसंतकुंज भागातील एका हॉटेलात ते उतरले होते. यावेळी आरोपीने संबंधित महिलेसोबत पुन्हा शरीरसंबंध ठेवले. दिल्लीतून मुंबईला परत गेल्यावर महिलेने लग्न करण्याची मागणी केली. मात्र, आरोपीने नकार दिल्यावर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.