दिल्लीच्या हौजखास या पॉश परिसरातील पंचशील पार्कमध्ये अनिसिया बत्रा (वय ३९) या एअर होस्टेसच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी एअरहोस्टेसच्या पतीला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी तिचा पती मयांक सिंघवी याला अटक केली. अटक करण्यापूर्वी पोलिसांनी मयांक याची जवळपास तासभर चौकशी केली त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आज मंगळवारी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले जाणार आहे.

छतावरून पडून मृत्यू झालेल्या एअर होस्टेसने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा पोलीस तपास करीत आहे. एअर होस्टेस अनिसियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केल्याने पोलिसांनी कलम ३०४ (ब) अंतर्गत हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे. तर, मयांक याने छतावरुन उडी मारल्याने तिचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणात माहिती दिली की, १३ जुलै रोजी मयांकला अनिशियाने मेसेज केला होता. त्या मेसेजमध्ये मोठं पाऊल उचलणार असल्याचं तिने म्हटलं होतं. मयांक त्यावेळी घरीच होता, आणि मेसेज मिळताच तो छतावर पोहोचला पण ती तेथे नव्हती. मयांकने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. अनिशियाच्या परीवाराला मात्र ही आत्महत्या वाटत नसून हत्येचा संशय आहे.

अनिसिया बत्रा ही लुफ्तहांसा एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करीत होती. अनिसियाचे वडील सैन्यातील निवृत्त अधिकारी असून अनिसियाच्या भावाने मयांक सिंघवी आणि त्याच्या कुटुंबियांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. अडीच वर्षांपूर्वी अनिसियाचे मयांकशी लग्न झाले होते. परंतु, लग्नानंतर या दोघांचे संबंध फारसे चांगले नव्हते. हनीमूनसाठी दोघेही दुबईत गेले होते. हनीमूनला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या पतीनं तिला मारहाण केली होती असा आरोप अनिशियाच्या कुटुंबियांनी केला आहे. मयांक दारू पिऊन घरी आला होता. तसेच त्यानं अनिशियाला मारहाण केली. तसेच तो आधीच विवाहित असून त्याचा घटस्फोट झाला होता, असे आम्हाला लग्नानंतर समजले, असा आरोपही अनिशियाच्या परीवाराने केला आहे.