नवी दिल्लीहून न्यूयॉर्ककडे निघालेल्या एअर इंडियाच्या एआय-१०१ या विमानात वैद्यकीय गरज उदभवल्याने हे विमान शनिवारी उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे उतरविण्यात आले आहे. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास या विमानाने न्यूयॉर्कसाठी उड्डाण केले होते. २४१ प्रवाशी १२ क्रू सदस्यांसह एकूण २५३ जण या विमानात होते. बोईंग ७७७ प्रकारचे हे विमान मध्य आशियाई देशावरुन उड्डाण करत असताना, अचानक एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याची माहिती हवाई सुंदरीने कॅप्टनला दिली. त्यावेळी हे विमान उझबेकिस्तानच्या हवाई हद्दीत होते.
वैमानिकाने लगेच ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई नियंत्रण कक्षाशी संर्पक साधत विमानात वैद्यकीय गरज उदभवल्याने तातडीच्या लॅंण्डीगची परवानगी मागितली. एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर साडेपाचच्या सुमारास हे विमान ताश्कंद विमानतळावर उतरले. त्यानंतर या प्रवाशाला लगेचच तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रवाशाचे नाव आणि त्याला काय त्रास झाला त्याची माहिती मिळू शकलेली नाही. उझबेकिस्तानमध्ये एअर इंडियाचे कार्यालय नसल्याने एअर इंडियाने तेथील भारतीय दूतावासाकडून मदत मागितली आहे.