भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेला तणाव तसेच पाकिस्तानच्या हवाई दलाच्या कुरापती या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आता पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. अमेरिका, युरोप या भागात जाणारी विमानं आता पाकिस्तानला वळसा घालून जाणार आहेत. विमानांचा नवीन मार्ग निश्चित झाल्यावर त्याबाबतची माहिती दिली जाईल, असे एअर इंडियातील सूत्रांनी सांगितले.

भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथे जैश- ए- मोहम्मदच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केले. यानंतर बुधवारी पाकिस्तानच्या हवाई दलातील तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. भारताच्या हवाई दलाने यातील एका विमानाला पाडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही देशांमधील तणाव वाढलेला असून या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने आता पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमानं नेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

एअर इंडियाचे अमेरिका, युरोप आणि आखाती देशांकडे जाणारे विमान यापूर्वी पाकिस्तान- अफगाणिस्तानमार्गे जायचे. आता ही विमान पाकिस्तानला वळसा घालून जातील, असे सांगितले जाते.  यामुळे विमान प्रवासाचा कालावधी एक ते दोन तासांनी वाढ होणार आहे. आता दिल्लीतून जाणारी विमानं मुंबईमार्गे मस्कत आणि तिथून पुढील इच्छित स्थळी जातील, असे सूत्रांनी सांगितले.