सरकारी विमान कंपनी असलेली एअर इंडिया सध्या प्रचंड तोट्यात असून तिचे खासगीकरण होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणीमुळे एअर इंडियाला आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देणेही अवघड होऊन बसले आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची मरीन ड्राइव्ह येथील २३ मजली इमारत संजीवनी ठरलीय. कारण, याच इमारतीच्या भाड्यातून कंपनीकडून कर्मचाऱ्यांचे पगार चुकते केले जात आहेत.

मरीन ड्राईव्ह या मुंबईतील महत्वाच्या भागामध्ये समुद्रालगत अगदी मोक्याच्या ठिकाणी एअर इंडियाची २३ मजली इमारत आहे. पूर्वी या इमारतीतच एअर इंडियाचे मुख्यालय होते. मात्र, ते आता दिल्ली येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे इमारतीतील अनेक मजले इतर कंपन्यांच्या कार्यालयांना भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. या भाड्यापोटी एअर इंडियाला वर्षाकाठी १०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. एअर इंडियाची विमान सेवा सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने यातून फायदा मिळणे दूरच तोटाच होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी कंपनीला खारीचा वाटा म्हणून का होईना मुंबईतील ही इमारत आधार ठरली आहे.

या २३ मजली इमारतीच्या प्रत्येक मजल्याचे क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट इतके असून सध्याच्या इथल्या जागेच्या मुल्यांकनानुसार कंपनीला प्रत्येक चौरसफुटासाठी ३५० ते ४०० रुपये उत्पन्न मिळते. म्हणजेच २३ मजल्याच्या या इमारतीतून कंपनी प्रत्येक मजल्यातून ३५ लाखांचे उत्पन्न मिळते. या इमारतीचे सर्वच्या सर्व मजले भाड्याने दिलेले नाहीत, इमारतीचा ९० टक्के भाग अर्थात १७ मजलेच भाड्याने दिलेले आहेत. तर काही मजल्यांवर अद्यापही एअर इंडियाचे काम चालते. मात्र, उर्वरित मजल्यांच्या भाड्यापोटी एअर इंडियाला वर्षाकाठी एकूण १०० कोटी रुपये उत्पन्न मिळते.

एअर इंडियामध्ये सध्या २१ हजार कर्मचाऱी काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी कंपनीला महिन्याला २०० कोटी रुपये इतका खर्च येतो. मात्र, हा खर्च भागवता येणारा नसला तरी या राष्ट्रीय ‘हवाई जहाज’ कंपनीला ही इमारत बुडत्याचा आधार ठरली आहे हे नक्की.