एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या विमानांची तांत्रीक बाब सांभाळणारा ‘सिता’ सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरात एअर इंडियाची विमान ठप्प झाली होती. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला होता त्यांचा चांगलाच खोळंबा झाला होता. चेक इनसह इतर प्रक्रियाही पूर्ण होण्यात अडचण येत असल्याने भारतासह परदेशातील एअर इंडियाच्या प्रवाशांना अडचणीला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता हा सर्व्हर पूर्ववत झाला असून तब्बल सहा तास विमानतळांवर अडकून राहिलेल्या प्रवाशांनी अखेर निश्वास सोडला आहे.

शनिवारी (दि.२७) पहाटे साडेतीन वाजल्यापासून हे सर्व्हर डाऊन झाले होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

‘सिता’ सर्व्हर हे एअर इंडियाच्या आयटी आणि कम्युनिकेशन विभागाची अत्याधुनिक यंत्रणा आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रवाशांना चेक इन करता येत नव्हते, त्याचबरोबर इतरही तांत्रिक बाबी पूर्ण होण्यास अडचणी येत होत्या. यामुळे एअर इंडियाच्या दिल्ली आणि मुंबई विमानतळांसह जगभरातील प्रवाशांना या अडचणीला तोंड द्यावं लागत होते. या प्रवाशांना कुठलीही ठोस माहिती मिळत नसल्याने ते अक्षरशः वैतागले होते.

दरम्यान, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनाही हा सर्व्हर कधीपर्यंत सुरु होईल याची अधिकृतरित्या माहिती मिळत नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.