दिल्ली विमानतळावरील सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने एअर इंडियाच्या जवळपास २३ विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे विमान प्रवास करणारे प्रवासी हैराण झाले आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कंपनीची चेक इन सर्व्हीस बंद पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे केवळ दिल्लीतील विमानेच नाही तर इतर ठिकाणच्या विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. चेक इन सर्व्हीसमध्ये नेमका काय बिघाड झाला आणि तो कशामुळे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना जवळपास १ तासाहून अधिक काळ ताटकळावे लागले.

चेक इन सर्व्हीसमध्ये बिघाड झाल्याने दुपारी १.३० ते २.३० या वेळात सर्व यंत्रणा बंद पडली होती. ही सेवा लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठी कंपनीकडून अतिशय वेगाने प्रयत्न करण्यात आले आणि तासाभरात यंत्रणा सुरळीत झाली. एयर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळात सर्व यंत्रणा पूर्वपदावर आली असून कोणत्या विमानाला किती उशीर झाला याबाबतची माहिती आम्ही घेत आहोत. एअर इंडिया एसआयटीए (SITA) या कंपनीकडून तांत्रिक सहाय्य घेते. त्यामुळे डेटा सेंटर आणि सर्व्हरची जबाबदारी या कंपनीवर असते.