बालाकोटमधील एअरस्ट्राईकनंतर बंद करण्यात आलेली पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी मंगळवारी खुली करण्यात आली. यासंदर्भात पाकिस्तान सिविल एव्हिएशन ऑथॉरिटीकडून एक नोटीस जारी करण्यात आली होती. तसेच पाकिस्तानची हवाईहद्द तात्काळ खुली करण्यात आल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले होते. यादरम्यान एअर इंडियाला कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची हवाई हद्द बंद करण्यात आलेल्या कालावधीत एअर इंडियाला तब्बल 430 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली.

नागरी उड्डायण राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान याबाबत माहिती दिली. दरम्यान, पाकिस्तानने हवाई हद्द खुली केल्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. तसेच पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्या कालावधीत एअर इंडियाला 430 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. विमान कंपनीला तोटा होण्याची अनेक कारणे असतात. यामध्ये 40 टक्के तोटा हा विमानाच्या इंधनामुळे होतो. तसेच पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीचा वापर बंद केल्यासारखी अन्य कारणंही असू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

2017-18 या आर्थिक वर्षात एअर इंडियाला 7 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले. सध्या कंपनीत 1 हजार 667 वैमानिक आहेत. यामध्ये 1 हजार 108 कायम स्वरूपी आणि 569 कंत्राटी वैमानिक आहेत. वैमानिकांची भरती एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे आणि वेळोवेळी यासाठी जाहिरातीदेखील देण्यात येत असल्याचे पुरी म्हणाले.