करोना कालावधीमध्ये घरी बसून कंटाळला आहात का? आणि तुम्हाला फिरायची हौस आहे का? तर एअर इंडिया तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक विशेष फ्लाइट. ऑस्ट्रलियाच्या ‘क्वांटास एअरलाईन्स’ने सुरु केलेल्या ‘फ्लाइट टू नोव्हेअर’ म्हणजेच कुठेही न जाणाऱ्या विमान उड्डाणाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानेही असाप्रकारची सुविधा भारतीयांसाठी देण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही विमाने ज्या विमानतळांवरुन उड्डाण करतील पुन्हा तेथेच उतरतील. भटकंतीची आवड असणाऱ्या मात्र करोनामुळे भटकंतीमध्ये खंड पडलेल्यांसाठी ही सुविधा म्हणजे सुवर्णसंधीच आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या विमानामधून प्रवास करणाऱ्यांना भारतामधील लोकप्रिय पर्यटनस्थळांचे हवेतून दर्शन घेता येईल. मात्र यामध्ये नक्की कोणत्या ठिकाणांचा समावेश केला जाणार आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. कोणत्या प्रदेशांवरुन ही विमानं प्रवास करतील, या विमानांच्या तिकिटांचे दर काय असतील आणि काय सुविधा पुरवल्या जातील यासंदर्भातील अंतिम निर्णय झालेला नसून त्याबद्दल चर्चा सुरु आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. “पर्यटनाच्या दृष्टीने हवेतून लोकप्रिय पर्यटनस्थळं पाहता येतील अशी उड्डाणांची सेवा उपलब्ध करुन देण्याचा विचार आम्ही करत आहोत. यासंदर्भातील इतर गोष्टींबद्दल चर्चा सुरु आहे,” असं एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. यासाठी बोईंग ७४७ सारखी विमानं वापरली जातील.

ऑस्ट्रेलियातील ‘क्वांटास एअरलाईन्स’ने सुरु केलेल्या फ्लाइट टू नोव्हेअरच्या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारची सेवा भारतात उपलब्ध करुन देण्याबद्दल एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांची सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील चर्चा झाली असं अन्य एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

काय आहे ऑस्ट्रेलियातील ‘क्वांटास एअरलाईन्स’ची योजना?

फ्लाइट टू नोव्हेअर म्हणजेच काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ‘कुठेच न जाणारं विमान’ म्हणजे काय यासंदर्भात सांगायचे झाल्यास, करोनामुळे अनेक महिने विमान प्रवासावरील बंदी नंतर हळूहळू देशांतर्गत विमानप्रवासाला परवानगी देण्यात आल्यानंतर क्वांटासने या विशेष विमानाची सोय प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. या विमानाच्या नावाप्रमाणेच ते कुठेही जाणार नाहीत. म्हणजे जाणार पण ज्या विमानतळावरुन उड्डाण घेईल तिथेच हे विमान पुन्हा उतरणार. त्यामुळेच या विशेष सुविधेला ‘फ्लाइट टू नोव्हेअर’ असं नाव देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियातील दर किती?

‘द इंडिपेन्डट’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘फ्लाइट टू नोव्हेअर’ची विमान ही सात तास उड्डाण करुन पुन्हा टेक ऑफ घेतलेल्या विमानतळावरच उतरतील. या तास तासांच्या प्रवासादरम्यान विमान देशातील सर्वात सुंदर ठिकाणांवरुन जाईल. ही विमानं सिडनी विमानतळावरुन उड्डाण घेणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी हे पहिले विमान उड्डाण घेणार आहे. या उड्डाणादरम्यान विमान युरु, द ग्रेट बॅरियर रिफ आणि ऑस्ट्रेलियातील इतर प्रमुख पर्यटनस्थळांवरुन प्रवास करणार आहे. या विमानामध्ये एकूण १३४ सीट आहेत. बोईंग ७८७ शैलीच्या या विमानातील तिकीटांचे दर ५७५ डॉलर (अंदाजे ४२ हजार रुपये) ते दो हजार ७६५ डॉलर (अंदाजे २ लाख) दरम्यान ठेवण्यात आले होते. मात्र अवघ्या १० मिनिटांमध्ये फ्लाइट हाऊसफूल झालं. “आमच्या कंपनीच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने विक्री झालेलं हे उड्डाण ठरलं आहे,” असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

…तर विमानांची संख्या वाढवणार

या उड्डाणाला मिळालेल्या प्रतिसादावरुन लोकांना प्रवासाची आणि त्यातही विमानतप्रवासाची खूप आठवण येत असल्याचे स्पष्ट होतं आहे. असाच प्रतिसाद मिळत राहिला तर आम्ही भविष्यात अशाप्रकारची काही आणखीन उड्डाणांचा नक्कीच विचार करु. सध्या आम्ही आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवण्याची वाट पाहत आहोत, असंही कंपनीचे प्रवक्ते म्हणाले. सिडनीबरोबरच कंपनीने अंटार्टीकालाही ‘जॉय राईड’ प्रकारचे विशेष उड्डाण आयोजित केलं आहे. युके आणि ऑस्ट्रेलियादरम्यान न थांबता सल १३ तास उड्डाण करणाऱ्या विमानांच्या मदतीने मेलबर्नवरुन ही विशेष सहलीसारखी उड्डाणे ठेवण्यात आलेली आहे. या उड्डाणांना चांगला प्रतिसाद मिळत असतानाच पर्यावरण प्रेमींनी याला विरोध केला आहे. आता कुठे वातावरण जरा स्वच्छ झालेलं असतानाच अशापद्धीतने इंधन वाया घालवणं योग्य नसल्याचे मत पर्यावरण प्रेमींनी मांडलं आहे.