मद्यधुंद अवस्थेत विमान उड्डाण करण्यास जाणाऱ्या एका महिला वैमानिकाला एअर इंडियाने रोखले आहे. यासोबत मद्यपान करुन विमानात प्रवेश करणाऱ्या एका कर्मचाऱ्यालादेखील एअर इंडियाने रोखले आहे. या दोघांनाही तीन महिने विमानात प्रवेश करण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.

महिला वैमानिक आणि क्रू मेंबर विमानात प्रवेश करण्याआधी त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. यामध्ये दोघांनी मद्यपान केल्याचे समोर आले. हे दोघे राजकोटवरुन नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानातील कर्मचारी होते. हा सर्व प्रकार २५ जानेवारीला घडला होता. हिंदुस्तान टाईम्सने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

डीजीसीएच्या नियमानुसार विमानात प्रवेश करण्याआधी वैमानिक आणि क्रू मेम्बर्सची वैद्यकीय चाचणी अनिवार्य आहे. मात्र एअर इंडियामध्ये हेड ऑफ ऑपरेशन्स पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यावरच ही चाचणी टाळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सध्या हेड ऑफ ऑपरेशन्स पदावरील अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे.

‘महिला वैमानिक आणि केबिन क्रू यांच्यासोबत विमानातील इतर कर्मचाऱ्यांचे एअर इंडियाकडून AI-9631 या विमानासाठी वेळापत्रक लावण्यात आले होते. २५ जानेवारीला AI-9631 हे विमान राजकोटवरुन नवी दिल्लीला उड्डाण करणार होते. महिला वैमानिक आणि केबिन क्रू विमानात जाण्याआधी त्यांची नियमानुसार वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यांचा श्वासोच्छवास तपासण्यात आला. ही चाचणी सकारात्मक होती,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाची माहिती डीजीसीएला देण्यात आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना तीन महिने विमानात प्रवेश करता येणार नाही. याप्रकरणी एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.