उड्डाण भत्ता मिळाला नाही तर विमानांचे उड्डाण थांबवू असा इशारा एअर इंडियाच्या वैमानिकांनी शुक्रवारी दिला. एअर इंडियाने वैमानिकांना जुलै महिन्याचा बेसिक पगार दिला. पण उडडाण भत्ता दिलेला नाही. वैमानिकांच्या एकूण पगारामध्ये बेसिक पगाराचा वाटा फक्त ३० टक्के आहे. उड्डाण भत्ता खूप मोठा असतो. एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांसह वैमानिकांना १४ ऑगस्ट रोजी पगार मिळाला.

वैमानिकांच्या एकूण पॅकेजमध्ये पगाराचा वाटा फक्त ३० टक्के आहे. त्याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. दर महिन्याला कंपनी अन्य कर्मचाऱ्यांचा पूर्ण पगार देते पण वैमानिक आणि केबिन क्रू च्या हवाई भत्त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एअर इंडियाच्या उत्पन्नामध्ये या दोघांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असे इंडियन कमर्शिअल पायलट असोशिएशनने एअर इंडियाच्या व्यवस्थापनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

यापूर्वी आम्ही पत्र लिहून पगाराला होणाऱ्या विलंबाचा मुद्दा उपस्थित केला होता. आमची उड्डाण भत्ता देण्याची मागणी तात्काळ मान्य केली नाही तर आम्ही कंपनीसाठी उपलब्ध असणार नाही असे नव्या पत्रात म्हटले आहे.