250 किमी ताशी वेगाने जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेस बोईंग 737-800 विमानाने त्रिची विमानतळावर संरक्षक भिंतीला धडक दिल्याने दुर्घटना झाली. दुर्घटनेत विमानाचं चांगलंच नुकसान झालं होतं. मात्र वैमानिकाने यानंतरही विमानाचं उड्डाण न थांबवता सुरु ठेवलं. तब्बल चार तास दुर्घटनाग्रस्त विमान हवेत होतं. आश्चर्य म्हणजे वैमानिकाला आपल्या विमानाने संरक्षण भिंतीला धडक दिलं असून दुर्घटनाग्रस्त झाल्याची कल्पनाच नव्हती.

या विमानात एकूण 136 प्रवासी प्रवास करत होते. त्यांच्यासह क्रू मेम्बर्सचा जीव वैमानिकाने धोक्यात घातला होता. हवाई वाहतूक नियंत्रणाने (एटीसी) दुर्घटना झाल्याची नोंद घेत तात्काळ वैमानिकांशी संपर्क साधला. यावेळी त्यांना तुमच्या विमानाने संरक्षण भिंतीला धडक दिल्याचं सांगितलं. वैमानिकांनी मात्र सर्व सिस्टिम व्यवस्थित काम करत असल्याचं उत्तर दिलं. त्यामुळे त्यांनी उड्डाण तसंच सुरु ठेवण्याचा निर्णय घेत, सुरक्षेच्या दृष्टीकोनाने विमान मुंबई विमानतळावर उतरवायचं ठरवलं. विमान उतरवून पाहिलं असता त्याचं बरंच नुकसान झालं असल्याचं समोर आलं

काय आहे घटना ?
त्रिची विमानतळावर रात्री 1.30 वाजता एअर इंडियाच्या विमानाने संरक्षक भिंतीला धडक दिली. विमानाने टेक ऑफ करताच काही अंतरावर ही दुर्घटना झाली. हे विमान त्रिचीहून दुबईला चाललं होतं. विमानात एकूण 136 प्रवासी प्रवास करत होते. वैमानिकाने पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावर विमानाचं लँडिंग केलं आणि नंतर सर्व प्रवाशांना तिथे थांबवण्यात आलं.