इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्याचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. अमेरिका आणि अन्य देशांनी इराक, इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण बंद केले आहे. आता एअर इंडियाने सुद्धा तसाच निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाने काय निर्णय घेतला?
एअर इंडियाने इराणच्या हवाई हद्दीतून युरोप, अमेरिकेला जाणाऱ्या आपल्या विमानांचे मार्ग बदलले आहेत. “आमचे प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेला आमचे पहिले प्राधान्य आहे. अमेरिका-इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांचे मार्ग तात्पुरते बदलण्याचा निर्णय घेतला आहे” अशी माहिती एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली.

हवाई मार्गात बदल केल्यामुळे उड्डाणाचा कालावधी वाढणार आहे. दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या विमानांना २० मिनिटे तर मुंबईहून ३० ते ४० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागणार आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे अन्य देशांच्या विमान कंपन्यांनी हवाई मार्गात बदल केला आहे.

अमेरिकेच्या विमानांना इराक, इराण, ओमानमधून उड्डाणांवर बंदी
अमेरिकन फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने इराण, इराक, ओमान आणि इराण-सौदी अरेबियाच्या सागरी हद्दीतून अमेरिकन प्रवासी विमानांची उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर खबरदारी म्हणून FAA कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

बुधवारी पहाटेच्या सुमारास इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन तळांवर बारापेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. मध्य आशियात वाढलेला राजकीय तणाव आणि लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने हा निर्णय घेतला आहे. अमेरिका वगळता अन्य देशांच्या प्रवासी विमानांची या भागातून उड्डाणे सुरु आहेत. एफएएच्या बंदीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. पण अन्य देश सुद्धा FAA चा सल्ला गांभीर्याने घेतात.