लैंगिक छळाच्या आरोपावरुन एअर इंडियाने सोमवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पदावरुन हकालपट्टी केली. एअर इंडियाच्या फ्लाईट सर्व्हीसच्या महाव्यवस्थापकावर हवाई सुंदरीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. त्याला पदावरुन हटवण्यात आले आहे. या संदर्भात मे महिन्यात संबंधित हवाई सुंदरीने केंद्रीय हवाई उड्डयाण मंत्री सुरेश प्रभू यांनी पत्र लिहून तक्रार केली होती तसेच तिने महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या मंत्रालयाकडेही दाद मागितली होती.
संबंधित महाव्यवस्थापकाने मागच्या सहावर्षांपासून आपला लैंगिक सुखासाठी छळ चालवला होता असा आरोप हवाई सुंदरीने केला होता. त्याचे वर्तन हिंस्त्र पशू सारखे असल्याचे तिने म्हटले होते. या प्रकरणात अजब योगायोग म्हणजे चौकशीला इतका का विलंब होतोय ? त्याचे स्पष्टीकरण मागण्यासााठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंह खारोला यांना समन्स बजावले. त्यानंतर लगेचच पदावरुन हटवण्याची कारवाई झाली.
पीडित हवाई सुंदरीने महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची भेट घेऊन त्यांना आपली परिस्थितीत सांगितली होती. त्यानंतर जून महिन्यात मंत्रालयाने या प्रकरणी एअर इंडियाकडून अहवाल मागवला होता. या प्रकरणी सरकारने एक निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करुन तपास करावा अशी मागणीही हवाई सुंदरीने तिच्या पत्रात केली होती. या पत्रानंतर सुरेश प्रभू यांनी खरोला यांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
महाव्यवस्थापक हिंस्त्र पशूसारखा असून त्याने आपल्यासमोर अनेकदा लैंगिक सुखाचा प्रस्ताव ठेवला. माझ्यासमोर त्याने अनेकदा इतर महिलांना अपशब्द वापरले. कार्यालयातच माझ्याबरोबर आणि इतर महिलांबरोबर अश्लील बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागण्या मान्य करण्यास नकार दिल्यामुळे त्याने वारंवार माझा अपमान केला. पात्र असूनही मला पद आणि अधिकार नाकारले. नोकरीच्या ठिकाणी त्याने माझ्या आयुष्याची वाट लावून ठेवली होती असे हवाई सुंदरीने २५ मे रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 4:05 am