13 December 2018

News Flash

जागा विकून ‘महाराजा’ उभारणार 500 कोटी रुपये, मुंबईतल्या पाली हिलमधल्या जागेचा समावेश

एअर इंडियावर आहे सुमारे 52 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा

प्रचंड तोट्यात असलेल्या आणि निर्गुंतवणुकीच्या दिशेने चाललेल्या एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या जागा विकून येत्या आर्थिक वर्षात 500 कोटी रुपये उभे करण्याचा प्रयत्न होणार आहे. एअर इंडियाच्या संपूर्ण देशभरात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी अनेक जागा असून त्यातल्या काही विकण्याचा प्रस्ताव असल्याचे दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं वृत्त आहे.

नवी दिल्लीमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेली चार एकरची जागा, वसंत विहार कॉलनीमधली रहिवासी प्रकल्प, चेन्नईमधली एका जागा आणि मुंबईतल्या पाली हिलमधला अर्धा एकरचा प्लॉट आदी विकून येत्या आर्थिक वर्षात पैसे उभारण्याचा प्रयत्न होणार आहे. काही जागा एअर इंडिया स्वत: विकेल तर काही जागा ज्या सरकारच्या आहेत व एअर इंडियाला भाड्याने दिल्या आहेत त्या सरकार विकेल असे सांगण्यात आले आहे.

जमिनी विकून पाच हजार कोटी उभारण्याचे लक्ष्य 2012 मध्ये एअर इंडियाच्या बाबतीत ठेवण्यात आले होते. दहा वर्षांमध्ये हे लक्ष्य गाठायचे असून तेव्हापासून 445 कोटी रुपये या माध्यमातून उभारण्यात आले आहेत. जमिनीच्या कागदोपत्री मालकिच्या मुद्यामुळे जमिनी विकून पैसे उभारण्याचे लक्ष्य गाठता आले नसल्याची कबुली नागरी उड्डाण खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली आहे.

ज्यांच्या मालकिच्या संदर्भात काही समस्या नाहीत अशा जागा 2018 – 19 मध्ये विकण्यात येतील असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. अनेक सरकारी कंपन्यांनीच एअर इंडियाच्या मालमत्तांची चौकशी केली आहे. जर सरकारी कंपन्यांना जमिनी किंवा इमारती इत्यादी विकायचं असेल तर एअर इंडियाला मंत्रिमंडळाच्या परवानगीची गरज भासणार नाही. परंतु जर खासगी क्षेत्रामध्ये या मालमत्ता विकायच्या असतील तर त्यासाठी मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागेल.

डिसेंबरपर्यंत एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्याचा सरकारचा मानस आहे. एअर इंडियानं जागांचे दर खूपच चढे ठेवल्यामुळे त्यांच्या जागांना अनुकूल ग्राहक मिळाला नसल्याचे एका तज्ज्ञानं म्हटलं आहे. त्यामुळे एअर इंडियाला आधी अपेक्षा कमी कराव्या लागतील. उदाहरणार्थ मुंबईतल्या पाली हिलच्या जागेसाठी एअर इंडियानं 200 कोटी रुपयांच्या राखीव रकमेची अपेक्षा ठेवली आहे जी बाजारभावापेक्षा जास्त असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे.

First Published on March 5, 2018 3:33 pm

Web Title: air india to sell prpperties to raise rs 500 crore