Air India एअर इंडियाची गत बंद पडलेल्या किंगफिशरसारखी होऊ देणार नाही आणि एअर इंडिया देशाची सेवा करत राहील अशी ग्वाही नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली आहे. विजय मल्ल्या यांची किंगफिशर कंपनी बंद पडली आणि नंतर बँकांना हजारो कोटींचा चुना लावून मल्ल्याही इंग्लंडला पळून गेले. त्या किंगफिशर एअरलाइनचा संदर्भ राजू यांनी दिला आहे.

एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या कुणाचीही नोकरी घालवण्याची आमची इच्छा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे राजू यांनी लोकसभेत बोलताना सांगितले. ‘कुणाचीही नोकरी जावी असं कुणालाही वाटत नाही. एअर इंडियाची किंगफिशर व्हावी असं आम्हाला वाटत नाही. एअर इंडियानं देशाची सेवा करावी अशीच आमची इच्छा आहे.’ प्रश्नोत्तराच्या तासात राजू यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समिती एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी कार्यरत आहे. या समितीला सूचना द्यायच्या असतील तर जरूर द्याव्या असे आवाहन राजू यांनी केले आहे. एअर इंडियाची निर्गुंतवणूक करण्याचे निश्चित असले तरी किती हिस्सा विकायचा, कसा विकायचा याबाबत महत्त्वाच्या गोष्टी ठरायच्या आहेत.

गेली अनेक वर्षे एअर इंडिया तोट्यात असून करदात्यांच्या पैशातून हा पांढरा हत्ती पोसला जात आहे. त्यामुळे एअर इंडियाचं खासगीकरण करावं, निर्गुंतवणूक करावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. आता, अर्थमंत्र्यांची समिती याबाबत निर्णय घेणार असून एअर इंडियाची किंगफिशर होऊ देणार नाही अशी ग्वाही राजू यांनी दिली आहे.

सध्या एअर इंडियाच्या डोक्यावर ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि २०१२ मध्ये युपीए सरकारने दिलेल्या ३० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या जीवावर कंपनी तरली आहे. तर २००३ मध्ये विजय मल्ल्या यांनी स्थापन केलेली कंपनी दोन वर्षांपूर्वी बंद पडली असून कंपनीने बँकांचे ९००० कोटी रुपये बुडावल्याचा आरोप आहे. कर्ज परतफेड शक्य न झाल्याने मल्ल्या इंग्लंडला पळून गेले असून भारत त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.