दिल्लीतील हवा प्रदूषणाने धोक्याचे पातळी केव्हाच ओलांडली असून तेथे त्यामुळे रोज ८० लोक मरतात, असा दावा एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात करण्यात आला आहे. तेथे प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्याने वर्षांला १० ते ३० हजार बळी जातात, असेही अहवालात म्हटले आहे.
एनव्हरॉनमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे, की पीएन २.५ प्रदूषकांमुळे दिल्लीत ४५ टक्के लोकांचा अकाली मृत्यू होतो, जागतिक आरोग्य संघटनेच्या स्वच्छ हवा निकषांचे पालन केले, तर दिल्लीतील ८५ टक्के मृत्यू टाळता येतील. जागतिक हवामानाचे शुद्ध हवेचे निकष पाळले तर देशात ४ लाख अकाली मृत्यू टाळता येतील. जर काहीच कृती केली नाही, तर भारतात हवा प्रदूषणाने मरणाऱ्यांचे प्रमाण २० ते ३० टक्के वाढणार आहे, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत पीएम २.५ कणांचे दर घनमीटरमधील वार्षिक सरासरी प्रमाण १५० मायक्रोग्रॅम आहे. ते जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित प्रमाणापेक्षा पंधरा पट अधिक असून देशातील मानकांपेक्षा चार पट अधिक आहे.
टेक्सास विद्यापीठाचे जोशुआ एस. आपटे, मिनेसोटा विद्यापीठाचे ज्युलियन डी. मार्शल व हेल्थ इफेक्ट इन्स्टिटय़ूटचे आरॉन कोहेन तसेच ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे मायकेल ब्राऊन यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनात असे दिसून आले, की जगात हवा प्रदूषण टाळल्यास दरवर्षी २१ लाख मृत्यू टाळता येतील. जागतिक हवामान संघटनेच्या मते पीएम २.५ कणांचे प्रमाण घनमीटरला १० मायक्रोग्रॅम असले तर चालू शकते. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज या आणखी एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे, की पीएम २.५ या कणांना फुफ्फुसात व रक्तात प्रवेश मिळतो, त्यामुळे जगात ३२ लाख लोक दर वर्षी मरण पावतात. हे लोक श्वसनाच्या रोगानेच मरण पावतात असे नाही तर त्यांना हृदयविकार व पक्षाघाताचा फटका बसतो असे आपटे यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे पाळली, तर भारत व चीनमध्ये १४ लाख अकाली मृत्यू टाळता येतात. हवा प्रदूषण टाळले तर भारत व चीन या दोन्ही देशातील मृत्युदर कमी करता येईल.

* जागतिक आरोग्य संघटनेचे पीएम २.५ कणांचे योग्य प्रमाण- घनमीटरला १० मायक्रोग्रॅम
* दिल्लीत असलेले पीएम २.५ कणांचे प्रमाण- घनमीटरला १५० मायक्रोग्रॅम