येत्या चार दिवसात चीनची राजधानी असलेले बीजिंग शहर यावर्षांतील सर्वात वाईट अशा काळ्या धुक्याच्या रूपातील प्रदूषणास तोंड देणार आहे. प्रदूषणाबाबत दुसऱ्यांदा लाल बावटा दाखवण्यात आला असून ही सर्वाधिक धोका असल्याची पूर्वसूचना असते. या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना चालू आहेत. बीजिंगची लोकसंख्या २.२ कोटी असून तेथे हवाप्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. बीजिंग शहरात धोक्याचा इशारा देतानाच उत्तरेकडेही पिवळ्या रंगाचा धोक्याचा इशारा चीनच्या हवामान प्रयोगशाळेने दिला आहे. बुधवापर्यंत हा प्रदूषणाचा धोका कायम राहणार आहे.
बीजिंगमध्ये आज २.५ मायक्रॉन व्यासाचे प्रदूषक कण मोठय़ा प्रमाणात आढळून आले ,त्यांचे प्रमाण घनमीटरला शंभर मायक्रोग्रॅम होते, ते आठवडाअखेरीस ५०० मायक्रोग्रॅम होईल. शनिवारी सकाळी सात ते मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. बीजिंग, तियानजीन तसेच हेबेई, हेनान व शांक्झी व शांगडाँग प्रांतात तसेच उत्तर चीनमध्ये प्रदूषण अधिक असेल. दक्षिण बीजिंग, मध्य हेबेई, उत्तर हेनान, पश्चिम शाँगडाँग येथे जास्त प्रमाणात काळे धुके असणार आहे. चीनमध्ये लाल बावटा दाखवला तर सर्वात गंभीर, त्यानंतर नारिंगी बावटा दाखवला तर त्यापेक्षा थोडे कमी गंभीर व पिवळा, निळा या रंगाचे बावटे लागल्यास तुलनेने आणखी कमी प्रदूषण असल्याचा संकेत मिळतो. बीजिंग महापालिका हद्दीत शनिवारी सकाळी ७ ते मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत हा इशारा लागू केला आहे. त्यामुळे सम-विषम क्रमांकानुसार वाहने रस्त्यावर धावतील. फटाके फोडणे व कोळशाच्या भट्टय़ा बंद ठेवण्यात येणार आहेत.